#HappyBirthdayDhoni : भारतीय क्रिकेटला धोनीने नवा चेहरा दिला – आयसीसी

आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचे कौतुक

लीड्‌स महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय विश्‍वचषक (2011), टी-20 विश्‍वचषक (2007) या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. तसेच त्याने 2007 मध्ये भारतास चॅंपियन चषक स्पर्धेतही अजिंक्‍यपद मिळवून दिले आहे. येथील विश्‍वचषक स्पर्धेनंतर धोनी हा निवृत्त होणार आहे. तसेच भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘महेंद्रसिंग धोनी याने भारतीय क्रिकेटला नवा चेहरा दिला आहे‘ अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. बीसीसीआय, चाहते आणि इतर क्रिकेट खेळाडूंकडून धोनीवर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

त्याच्या कामगिरीचे कौतुक करताना आयसीसीने ट्विटरद्वारा म्हटले आहे की, ‘धोनी हा अतिशय परिपूर्ण खेळाडू आहे. त्याने भारतीय क्रिकेट क्षेत्रास प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे. केवळ भारतीय नव्हे तर जगातील अब्जावधी चाहत्यांच्या मुखी सतत धोनी याचेच नाव असते’.

भारताचा कर्णधार विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांनीही धोनी याच्याबद्दल गौरवास्पद व्हिडिओ प्रसारित केला आहे. ते म्हणतात, ‘धोनी याच्याकडे पाहिल्यास वरकरणी तो थोडासा तापट असावा असे वाटते. मात्र, तो अतिशय शांत व संयमी खेळाडू आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करताना प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून होणाऱ्या चुकांचा त्याला अत्यंत सखोल अभ्यास असतो व त्याप्रमाणे तो गोलंदाजांना सूचना देत असे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना गोलंदाजीस पूरक कशी लावावी हे त्याच्याकडून शिकले पाहिजे. प्रत्येक सहकाऱ्याला मदत करण्यासाठी तो सदोदित पुढे असतो’.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्‍स याने सांगितले की, धोनी याच्यासारखा महान यष्टीरक्षक होणार नाही. त्याची निरीक्षणशैली खूपच कौतुकास्पद असते. एखाद्या निर्णयाबाबत तिसऱ्या पंचाकडे दाद मागताना त्याच्याइतका आत्मविश्‍वास अन्य कोणत्याच खेळाडूकडे मी पाहिला नाही.

इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर यानेही धोनीबद्दल गौरवास्पद उदगार व्यक्त करताना सांगितले की, ‘यष्टीरक्षक म्हणून काम करताना कोणते तंत्र वापरले पाहिजे याबाबत मी त्याला गुरुस्थानीच मानतो. धोनी म्हणजे संयमाचा पुतळाच आहे. एखाद्या फलंदाजाला यष्टीचीत करताना त्याची शैली अतुलनीयच आहे’.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)