कर्नाटकमधील पेचाचे मुंबईत महानाटक 

संकटमोचक शिवकुमार यांची बंगळूरला परत पाठवणी 
मुंबई – कर्नाटकमधील राजकीय पेचाशी संबंधित महानाटक बुधवारी मुंबईत घडले. अस्थिरतेच्या संकटाला सामोरे जात असलेल्या कर्नाटकमधील कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारचे संकटमोचक डी.के.शिवकुमार यांच्या आगमनाने राजकीय नाट्याचे केंद्रस्थान मुंबई बनले. मात्र, मुंबई पोलिसांनी शिवकुमार यांना हालचाली करण्याची संधीच दिली नाही. त्यांना ताब्यात घेऊन बंगळूरला पुन्हा पाठवण्यात आले.

कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीच्या 16 आमदारांनी आतापर्यंत राजीनामा दिल्याने तेथील सरकार अडचणीत आले आहे. राजीनामा देणाऱ्यांपैकी आघाडीचे 10 आणि 2 अपक्ष असे मिळून 12 आमदार शनिवारपासून मुंबईत मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू मुंबई महानगरी ठरली आहे. बंडखोर आमदार सध्या पवईतील लक्‍झरी हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मंत्री असणारे शिवकुमार सकाळच्या सुमारास हॉटेलबाहेर दाखल झाले. मात्र, पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखले. हॉटेलमध्ये रूम बुक केली असल्याचे सांगून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिले नाही.

काही कारणास्तव शिवकुमार यांचे बुकिंग रद्द करण्यात आल्याचा निरोप त्यांना हॉटेलकडून देण्यात आला. त्यानंतरही शिवकुमार हॉटेलबाहेरच तळ ठोकून बसले. त्यामुळे त्यांना आणि मिलिंद देवरा, नसीम खान या मुंबईतील कॉंग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर काही तासांनी शिवकुमार यांची बंगळूरला परत पाठवणी करण्यात आली. पोलिसांनीच त्यांना मुंबईतील विमानतळावर नेऊन सोडले. पवईतील हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकमधील बंडखोर आमदारांनी त्यांच्या जीविताला धोका असल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. त्यामुळे शिवकुमार यांचे आगमन होण्याआधीच पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित हॉटेलबाहेर सज्ज ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)