महाराष्ट्राला सर्वांधिक “फायर अलर्ट’

– सर्वाधिक वणवे लागणाऱ्या प्रदेशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
– गेल्या सात दिवसांत तब्बल 467 आगीच्या सूचना
– राज्यात 5 हजार 993 आगीच्या घटना
 
पुणे – नैसर्गिक अथवा मानवनिर्मित कारणांमुळे जंगलात सातत्याने लागणाऱ्या आगी आणि त्यातून होणारे वनसंपदेचे नुकसान हे वनविभागासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. देशात सर्वाधिक वणवे लागणाऱ्या प्रदेशात महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भारतीय वन सर्वेक्षण संस्थेच्या (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) पाहणीतून समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या सात दिवसांत सर्वाधिक “फायर अलर्ट’ महाराष्ट्रासाठी देण्यात आले असल्याचेही या पाहणीतून समोर आले आहे.
भारतीय वन सर्वेक्षण संस्था ही देशातील वनांवर देखरेख आणि वनांशी निगडित समस्यांबाबत अभ्यास करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. संस्थेतर्फे जंगल क्षेत्र, ई-सर्व्हेलन्स, वनसंपदा तसेच वनांमध्ये पेटणारे वणवे यासंदर्भात व्यापक काम केले जाते. नुकतेच संस्थेतर्फे वणव्यांबाबत “अलर्ट’ देण्यासाठी “फॉरेस्ट फायर 3.0′(एफ.एफ.3.0) या अद्ययावत यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या अंतर्गत देशातील जंगलांमधील वणव्यांबाबतच्या सूचना देण्यात येतात.

या यंत्रणेच्या पाहणीनुसार नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत देशातील सर्वाधिक वणवे पेटणाऱ्या प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश प्रथम क्रमांकावर तर तेलंगणा तृतीय क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या सात दिवसांत सर्वाधिक फायर अलर्ट देण्यात आलेल्या प्रदेशांमध्ये राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. एफ.एफ.3.0 च्या पाहणीनुसार राज्यात आतापर्यंत पाच हजार 993 आगीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. तर, गेल्या सात दिवसांत तब्बल 467 आगीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वनांमध्ये अथवा वनक्षेत्रालगत लागणाऱ्या या आगींमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या वनांमध्ये राहणारे वन्यप्राणी तसेच या परिसरातील नागरिक यांनादेखील या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र असे असतानाही राज्याच्या वनविभागाकडून अद्याप वणव्यांबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्यात आलेला नसल्याची माहिती विभागातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेमुळे या घटना आणखी वाढतात. त्यामुळे येत्या काळात वणव्यांबाबत उपाययोजना करणे हे वनविभागासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

हवेतील प्रदूषण वाढीस कारणीभूत

जंगल परिसरात सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे निघणाऱ्या धुरातून मोठ्या प्रमाणात प्रदूषके हवेत फेकली जातात. या प्रदूषकांमुळे परिसरातील हवेचे प्रदूषण होते. तसेच, या ठिकाणी वास्तव्यास असणारे वन्यप्राणी तसेच माणसे यांनादेखील आरोग्याच्या विविध समस्या उद्‌भवतात. विशेषत: श्‍वसनाचा त्रास, त्वचेचे विकार यासारख्या आजारांमध्ये वाढ होते.

…काय आहे 3.0 यंत्रणा

भारतीय वनसर्वेक्षण संस्थेतर्फे विकसित करण्यात आलेली “3.0′ ही यंत्रणा वणव्यांबाबत देखरेख करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. नासा आणि इस्त्रो यांच्या मदतीने ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आगींचा “रिअल टाइम डाटा’ देण्याबरोबरच त्या आगींचा “ट्रॅक’ ठेवण्याचे काम देखील या यंत्रणेकडून केले जाते. तसेच जंगलांतील आगीचे बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत “अलर्ट’ जाहीर केला जातो.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)