वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य समर लीग ब्रीज स्पर्धा
नाशिक – महाराष्ट्र राज्य समर लीग ब्रीज स्पर्धेमध्ये स्विस लीग प्रकारात जितेंद्र सोलाणी, मिलिंद आठवले, अनिल शहा आणि एस. धाक्रस यांचा समावेश असलेल्या पोद्दार संघाने 104. 36 गुण मिळवून विजेतेपद पटकावले. व्ही. एम. लाल, आर. श्रीधरन, अनिल सामंत, अनिल टिकरे, जॉयरूप मल्लिक आणि अरीत्य भट्टाचार्य यांच्या ट्रीक्स संघाने त्याखालोखाल 96. 88 गुण मिळवून उपविजेतेपद पटकावले.
तसेच आबा ब्लू संघाला तिसरा आणि डब्लू. सी. जी. संघाला चौथे स्थान मिळाले. या प्रकारात नाशिकच्या केनसिंगटन संघाकडून खेळणाऱ्या हेमंत पांडे, सूर्या रेड्डी, अनिल पाध्ये, डॉ. अतुल दशपुत्रे, विनय देसाई आणि मनीष बहुगुणा यांनी आणि मित्र विहारच्या जहांगीर इराणी, जे. आर. परांजपे, दिलीप गोसावी आणि डॉ. प्रशांत पुरंदरे यांनी चांगले प्रदर्शन केले. परंतु त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.
दुसऱ्या आयएमपी पेअर्स प्रकारात श्रीकांत तांबे आणि डॉ. राहुल दलाल या पेअरने 87.00 गुण मिळवून विजेतेपद पटकावले. एस. छाजेड आणि ए. जे. पुरवले या पेअरने 68. 00 गुण मिळवून उपविजेतेपद मिळविले. पोद्दार संघाने पहिल्या दोन राऊंडमध्ये चांगला खेळ करून आघाडी मिळविली. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. मात्र नंतरच्या तीन सामन्यात पोद्दार संघाने सय्यमने खेळ करून चांगले गुण घेतले.
या सततच्या चांगल्या खेळामुळे पोद्दार संघाने सर्वात जास्त 104.36 गुण मिळवून विजेतेपद पटकावले. आयएमपी पेअर्स प्रकारात दिवसभर खेळलेल्या गटवार साखळी सामन्यात श्रीकांत तांबे आणि डॉ. राहुल दलाल या पेअरने आपआपसात चांगला समन्वय साधून सर्व सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ करून आपली छाप सोडली. त्यांनी सर्वाधिक 87.00 गुण मिळवत विजेतेपद पटकावले.