रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर

गौतमकुमार चॅटर्जी : देशात नोंदणी प्रकल्पांपैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक महाराष्ट्रातील

पुणे – महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात एकूण रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांपैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये महारेराच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळेच हे शक्‍य झाले. आज देशात 35 हजार प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे 18 हजार प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य कायमच अग्रेसर राहिले असल्याचे महारेराचे अध्यक्ष गौतमकुमार चॅटर्जी यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) यांच्यातर्फे “ट्रेनिंग ऑफ एक्‍स्पर्टस ट्रेनर्स’ या उपक्रमाला पुण्यात सुरुवात करण्यात आली. उपक्रमाचे उद्‌घाटन महारेराचे अध्यक्ष चॅटर्जी यांच्या हस्ते नांदेड सिटी येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान करण्यात आले. यावेळी क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, क्रेडाईच्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचाल डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का याबरोबरच कुशल क्रेडाईचे समीर बेलवलकर, कपिल त्रीमल, अभिजित अचलारे, महारेराचे मुख्य तांत्रिक अधिकारी ज्ञानेश्‍वर हडदरे हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी महारेराचे अध्यक्ष चॅटर्जी म्हणाले, रेरा कायद्यांतर्गत बांधकामाच्या दर्जाविषयी देखील काही तरतुदी आहेत. बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाच वर्षांपर्यंत बांधकाम पद्धतीतील काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला याविषयी रेराकडे दाद मागता येते. या त्रुटी येऊ नयेत आणि बांधकाम सुरू असतानाच बांधकाम साहित्याचा दर्जा आणि बांधकाम प्रक्रियेची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखली गेली तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या तक्रारी नक्‍कीच कमी होतील. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आम्ही येत्या पाच वर्षांत राज्यातील 15 लाख कामगारांना याविषयीचे प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला आहे.

कामगारांची ही संख्या अतिशय मोठी असल्याने त्यांना प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करणे गरजेचे आहे. नेमकी हीच गरज ओळखून आम्ही असे 500 तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. हे प्रशिक्षक महारेरा नोंदणीकृत बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांवर जाऊन तेथे कार्यरत असलेल्या बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देणार आहेत. महारेरातर्फे या 500 तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण प्रक्रियेसाठी 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अंतर्गत पुणे विभागात सुमारे 225 तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्यात येतील ज्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोची मदत घेणार असल्याचे चॅटर्जी यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)