स्टार्टअप धोरण राबवण्यात महाराष्ट्राला अपयश : पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणांनी केली राज्य सरकारची पोलखोल

केंद्रिय उद्योग मंत्रालयाचा अहवाल केला सादर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई: महाराष्ट्राला “देशाचे स्टार्टअप कॅपीटल करू’ अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा फसवी आहे, असे सांगत स्टार्टअप धोरण राबवण्यात महाराष्ट्राला अपयश आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यासाठी केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयाने 20 डिसेंबर 2018 रोजी सादर केलेला अहवालच सादर करून चव्हाण यांनी राज्य सरकारची पोलखोल केली आहे. या अहवालानुसार देशातील 27 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या या क्रमवारीत महाराष्ट्राला पहिल्या 15 मध्येदेखील स्थान मिळवता आले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुंबई कॉंग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत फडणवीस सरकारच्या स्टार्टअप धोरणाची पोलखोल करणारा केंद्र सरकारचा अहवाल सादर करून सर्वांनाच धक्का दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत रोजगार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे. एका बाजूला सरकारी नोकऱ्यातील मेगाभरतीची स्वप्ने दाखवत राज्य सरकारने चार वर्ष महाराष्ट्रातील तरुणांना झुलवले, तर दुसरीकडे उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी फक्त पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली, अशी टीका करतानाच उद्योग क्षेत्रातील इतर अनेक फसव्या घोषणांप्रमाणे महाराष्ट्राला “देशाचे स्टार्टअप कॅपीटल करू’ अशी मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असल्याचा सप्रमाण दाखला खुद्द केंद्र शासनानेच दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. याबाबतीत अपयशी ठरलेल्या महाराष्ट्राला राज्याचे स्टार्टअप धोरण कसे राबवावे यासाठी प्रगत गुजरातकडून धडे घ्यावे असे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाने या अहवालात राज्यांची कामगिरी मोजण्यासाठी 38 निर्देशकांना 7 प्रवर्गात विभागले आहे. या सातपैकी एकाही प्रवर्गात महाराष्ट्राचे अस्तित्व दिसून येत नाही. याहून गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्राने 38 पैकी 17 निर्देशांकात कोणतेच काम केले नसल्याने माहिती देण्यास असमर्थ ठरला आहे. या अहवालात 100 पैकी 100 मार्क मिळवून गुजरात राज्य अग्रेसर ठरले तर महाराष्ट्राला 100 पैकी 25 ते 50 मार्क मिळाले असून क्रमवारीमध्ये अगदी तळाशी स्थान आहे. उत्तम कामगिरी असलेल्या 11 राज्यांकडून इतर पिछाडीवरील राज्यांना मार्गदर्शन घ्यावयाचे असून त्यामध्ये महाराष्ट्राने गुजरातकडून शिकावे असे केंद्र शासनाने ठरवले आहे, असे चव्हाण यांनी निदर्शनास आणले.

उद्योगक्षेत्राचा विकासदर कमी                                                                                            फडणवीस सरकार आल्यापासून पासून महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्राचा विकासदर सातत्याने कमी होत आहे. सन 2015-16 मध्ये उद्योगाचा विकास दर 7.2 टक्के होता, 2016-17 मध्ये 6.9 टक्के झाला, पुढे आणखी घसरुन 2017-18 साली उद्योग विकासदर 6.5 टक्के झाला आहे. मागील चार वर्षात राज्यातील एकूणच औद्योगिक धोरणात फक्त जाहिराती आणि मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांसारख्या इव्हेंटचा भरणा आहे. केंद्राच्या व्यापार सुलभता क्रमवारीतदेखील महाराष्ट्राची कामगिरी सातत्याने घसरत आहे. 2015 महाराष्ट्राचा देशात 8 वा क्रमांक होता 2016 साली घसरून तो 10 वा झाला, 2017 साली 11 वा तर 2018 मध्ये 13 आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

सोयीची आकडेवारी सांगून दिशाभूल करू नका- मुनगंटीवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्रपरिषदा घेत सुटले आहेत. पण महाराष्ट्राची बदनामी निदान माजी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने तरी करू नये, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. ज्या अहवालाचा संदर्भ घेत पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत, त्याच अहवालात देशात एकूण 14,036 स्टार्टअप मान्यताप्राप्त आहेत आणि त्यापैकी सर्वाधिक 2787 स्टार्टअप हे महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्राने फेब्रुवारी 2018 मध्ये स्टार्ट अप धोरणाची घोषणा केली आणि डीआयपीपीने जे रॅंकिंग जाहीर केले, ते मे 2018 पर्यंत या धोरणाच्या केलेल्या इव्हॅल्यूशनवर आधारित आहेत. सर्वाधिक स्टार्टअपच्या माध्यमातून महाराष्ट्र हेच स्टार्टअप कॅपिटल बनले आहे. त्यामुळे केवळ सोयीची आकडेवारी सांगून दिशाभूल करू नका, असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. औद्योगिक विकास दरात सुद्धा महाराष्ट्र हेच अग्रणी राज्य असून, आजही देशाच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)