ग्रेट पुस्तक : महाराणी येसूबाई

ती रणरागिणी, ती योद्धा, ती लखलखत्या धारदार तलवारीला पेलणारी म्यान, ती सौंदर्यवती,ती नाजूक, ती सहनशीलतेचा साक्षात महामेरू ती साक्षात रुद्राची भार्या, ती छाव्याची अर्धांगिनी क्षत्रिय कुलवतंस घराण्याची सुनबाई. एव्हाना नाव लक्षात आलेच असेल तुमच्या. तर अस्मिताच्या वाचकांसाठी घेऊन आले आहे अनंत तिबिले लिखित महाराणी येसूबाई या पुस्तकाचा अभिप्राय. हे फक्त पुस्तकं नाहीच, हा तर महाराणी येसुबाईच्या शौर्याचा ग्रंथच!

दोन वर्षाच्या गोड अन साहसी येसूबाईंना पाहून शिवछत्रपती भारावून गेले. तातडीने त्यांनी त्यांच्या पित्यास म्हणजेच पिलाजीरावास बोलावून घेतले अन शंभू राजांसाठी येसूबाईला मागणी घातली. जिजाऊँचा आशीर्वाद घेऊन हा लग्नसोहळा पार पडला. अगदी लहान वयापासून त्या जिजाऊंच्या छत्रछायेत वाढल्या. लहानपणापासून त्या घोड्यावर बसणे, तलवार चालवणे असे अनेक साहसी प्रकार करत असत. शंभूराजांचा स्वभाव रुद्रासारखा, तर त्या अगदी शांत! त्यामुळे रुद्राला समजावणे फक्त राज्ञीलाचं जमत असे. सईबाईंच्या जाण्यामुळे शंभू महाराज जिजाऊच्या मायेत वाढले पण त्यांच्या जाण्यामुळे ते अगदी पोरके झाले होते येसूबाईंचा मोठा आधार त्यांच्या पाठीशी होता.

औरंजेबाच्या तावडीतून सुटून महाराज गडावर आले ते एकटे शंभू महाराज आपल्यात नसल्याची अफवा घेऊन त्यावेळीच्या येसूबाईंच्या मनस्थितीची कल्पनासुद्धा करवत नाही. पुस्तकात तो ह्रदयदावक प्रसंग अंगावर काटा आणणारा असला, तरी त्यांच्या धैर्याची दाद देणारा आहे शंभू महाराजांना होत असलेल्या आंतरिक त्रासाची झळ येसूबाईंना सोसावी लागत असे. त्या युद्धनिपुण तर होत्याच पण छत्रपतींनंतर शंभू महाराज राजकारणातही त्यांचे सल्ले घेत असत. छ. राजाराम महाराजांना त्या मुलाप्रमाणे सांभाळत असत. शंभू महाराज रसिक होते, निर्मळ मनाचे धाडसी होते. खरं तर त्यांचा इतिहास जनमानसाच्या हृदयावर कोरला गेला आहे. ते काय होते, हे मी शब्दात मांडण्याचे धाडसही करू शकत नाही. सूर्याकडे पाहण्याचे धैर्य माझ्यात नाही पण एक स्त्री म्हणून येसूबाईंच्या मनाचा किंचितसा विचारही हृदयाला कापरे भरण्यासारखा आहे.

शूर योद्धा लाखात एक असतो, असे म्हणतात. तर त्यांची पत्नी दहा लाखात एक असते. ते हृदय कशाचे असते, ते त्यांस ठाऊक. पुस्तकाची भाषा ऐतिहासिक काळाशी सुसंगत आहे. त्यामुळे त्या काळात वावरत असल्याचा भास होतो. प्रत्येकाच्या मनस्थितीचे वर्णन अचूक अन हृदयाचा ठाव घेणारे आहे. संभाजी महाराज पुन्हा एकदा औरंगजेबाच्या तावडीत सापडले, तेंव्हाचा प्रसंग अन त्यांच्या धैर्यशील मरणानंतर हातात तलवार घेणाऱ्या महाराणी येसूबाई कधी आपल्या संपूर्ण मनाचा, बुद्धीचा, हृदयाचा ताबा घेतात कळतही नाही. काही मनात कोरले गेलेले प्रसंग, शंभू महाराजांचे विचार अन शेवट याचा मी उल्लेख केला नाही. कारण हे सुंदर पुस्तकं तुम्ही वाचावे अशी मनापासून इच्छा आहे पुस्तकं वाचताना शूर पत्नी होणं काय असते याचा प्रत्यय येतो येसू बाई प्रेमळ, सहनशील अन तितक्‍याच धाडसी होत्या; राजकारणकुशल होत्या सर्वाथाने त्या छाव्याची पत्नी, छत्रपतींच्या सुनबाई, तर जिजाऊंची लाडकी लेक म्हणून शोभत होत्या.अशा या शूर महाराणीस मानाचा मुजरा हे पुस्तकं तुम्ही नक्की वाचा.

धन्यवाद!

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)