लोकसभा निवडणुकीचा माहोल थंडा थंडा, कूल कूल

प्रा. डी.के. वैद्य

अकोले – अकोले विधानसभा मतदारसंघात प्रचाराची राळ उडालीच नाही. उलट ग्रामपंचायत निवडणुकीचा माहोल लोकसभा निवडणुकीपेक्षा “लय भारी’ असतो अशी चर्चा सध्या तालुक्‍यातील कानाकोपऱ्यात सुरू आहे. किमान ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण सारे गाव एका वेगळ्याच उर्मीने एकमेकांशी राजकीय लढाईत झुंजत असते. मात्र आता राजकीय लढाई असूनही लोकसभेची निवडणूक मात्र अजूनही “थंडा थंडा’ “कूल कूल’ असे “शांत शांत’ वातावरण आहे.
लोकसभेसाठी वीस उमेदवार उभे आहेत. मात्र शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, अपक्ष उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आघाडीचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांचा अपवाद सोडल्यास अकोले विधानसभा मतदार संघात इतर 17 उमेदवारांचा फारसा बोलाबाला नाही.

अकोले तालुका व संगमनेर तालुक्‍याचा काही पठार भाग अकोले विधानसभा मतदारसंघाला जोडलेला आहे. युतीचा प्रचार या विधानसभा मतदारसंघात संयुक्तरीत्या दिसलेला नाही. शिवसेना व भाजप यांच्या वेगवेगळ्या गटागटांनी भेटीगाठी, पत्रकबाजी, ध्वनिवर्धकाचा पुकारा यांचा अपवाद सोडला तर त्यापलीकडे प्रचारात फारशी प्रगती दिसली नाही. खा. लोखंडे, आ. दराडे व स्थानिक युतीच्या कार्यकर्त्यांनी भेटीगाठी व बैठकांवर भर दिल्याचे दिसून आले.

आघाडीसाठी मात्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रचारात सुसूत्रता ठेवली असल्याचे आढळून आले. माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभा उपाध्यक्ष मधुकर नवले, मीनानाथ पांडे यांनी सभा घेतल्याचे माहिती घेता दिसून आले. त्यांच्याही कार्यकर्त्यांनी गावोगाव भेटीगाठी, पत्रकबाजी आणि बैठकांवर भर दिल्याचे आढळून आले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मात्र गावोगाव भेटीगाठी घेऊन लोकांशी संवाद साधणाऱ्या बैठका घेतल्या. गावोगाव चिन्ह पोहोचवणारे काम करताना 191 गावांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी त्यांनी यशस्वी काम केल्याचे दिसून आले. रोजंदारीवर माणसे लावून आपले चिन्ह व आपल्या भूमिकेचे फलक त्यांनी ठिकाणी पोहोचवले. त्याचबरोबर स्थानिक युतीचे कार्यकर्ते त्यांनी हाताशी धरून उघडउघड प्रचार मोहीम यशस्वीपणे शेवटच्या टप्प्यापर्यंत आणून पोचवली आहे.

ठिकठिकाणच्या आठवडे बाजारांचा अपवाद वगळला तर ध्वनिवर्धकावरील प्रचारही एरवीच्या थाटामाटात दिसून आलेला नाही. “ताई माई अक्का, विचार करा पक्का’ या व अन्य ध्वनिवर्धकाच्या घोषणा या शिगेला पोहोचलेल्या दिसून आल्या नाहीत. जीवाची लाही लाही करून टाकणारे उष्ण वातावरण, आचारसंहितेचा धसका आणि ही स्थानिक निवडणूक नाही, यामुळे सुद्धा निवडणूक वातावरणाला निवडणुकीची “झिंग’ चढली नाही. अशा प्रकारचे विधान केले तर ते वावगे ठरणार नाही. गावोगावी होणारा कार्यकर्त्यांसाठीचा पैसा वापर नाही. की आगामी प्रलोभने दिसून येत नाहीत. असे ठिकठिकाणच्या गावांची माहिती घेताना कार्यकर्ते व निवडणुकीबाबत जनता उदासीन असल्याचे दिसून आले.

अशा उन्हाळी वातावरणात 29 तारखेला हे मतदान होणार आहे. जर मतदार वाहतूक केली गेली नाही, तर अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये डोंगर दऱ्यातील वाड्या-वस्त्यांवरील मतदार निवडणूक मतदान केंद्रापर्यंत जाण्याची शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे 50 ते 52 टक्के यापेक्षा मतदान अधिक होण्याची शक्‍यता कमीच आहे. अशा प्रकारची माहिती अण्णासाहेब एखंडे (टाहाकारी) यांनी दिली. मतदार राजा हा घराबाहेर निघण्यासाठी सकाळी दहापूर्वी व सायंकाळी पाचनंतरच प्रयत्न केल्याखेरीज बाहेर पडणार नाहीत असे ठामपणे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)