मनमानी कारभारामुळे महाबळेश्‍वर पालिका आर्थिक संकटात?

ठेकेदारांना मिळेनात बिले अन्‌ निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मारावे लागताहेत हेलपाटे

महाबळेश्‍वर – क वर्ग पालिकांमध्ये राज्यातील सर्वात श्रीमंत म्हणून महाबळेश्‍वर पालिका ओळखली जाते. परंतु मनमानी कारभारामुळे ही पालिका आर्थिक संकटात असल्याचे दिसते. कारण ठेकेदारांना वेळेवर बिले मिळत नाहीतच परंतु निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्‍काच्या रक्‍कमेसाठीही पाच सहा महिने हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना पालिकेच्या या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या आयुष्यातील उमेदीची 35 ते 40 वर्षे सेवेत घालविल्यानंतर उतार वयात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात भविष्य निर्वाह निधी या रक्‍कमेला अनन्यसाधारण महत्व असते. या एकरकमी मिळणाऱ्या रक्‍कमेवरच भविष्यातील जीवनाची अनेक गणिते अवलंबून असतात. महाबळेश्‍वर पालिकेचा इतिहास पाहिला तर निवृत्तीच्या वेळीच कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात होत्या. कर्मचारी यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेला भविष्य निर्वाह निधीला पालिका कधी हात लावत नव्हती.

त्यामुळे निवृत्त कर्मचारी यांना निवृत्तीच्या वेळीच सर्व रक्‍कम देणे जमत होते. परंतु, अलिकडे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला अनेक महिने आपल्या हक्‍काच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्‍कमेसाठी हेलपाटे मारावे लागत आहे. भविष्य निर्वाह निधी बरोबरच सेवा निवृत्तीवेतन व उपदानाची रक्‍कम, सेवा निवृत्तीच्या 40 टक्‍के भागाच्या अंश राशीकरणाची रक्‍कम व उर्जित शिल्लक रजेचे वेतन या रक्‍कमाही पालिकेतुन निवृत्त कर्मचारी यांना वेळेवर मिळणे कठीण झाले आहे याचा अर्थ भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम इतर कामासाठी वापरली जात असवी, अशी शंका व्यक्‍त केली जात आहे. याला पालिकेचा भोंगळ कारभार कारणीभुत असल्याची टिका केली जात आहे.

नुकतेच अनेक कर्मचारी हे सेवा निवृत्त झालेले आहेत ते आता आपल्या हक्‍काच्या निधीसाठी पालिकेते खेटे घालत आहेत ज्या पालिकेत आयुष्य घालविले त्याच पालिकेत त्यांना आता खेटे घालावे लागत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. या सर्व बाबींमुळे पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा अरोप विरोधक करीत आहेत.
ज्यांनी शहरातील लोकांच्या सेवेत आपले आयुष्य खर्ची केले त्या कर्मचाऱ्यांना पालिकेतून मिळणारी वागणुक ही निंदनीय आहे. पालिकेने कामाच्या प्राधान्यक्रमात बदल करावा, पालिकेने निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्‍काच्या निधीला प्राधान्य देवून तो निधी तातडीने द्यावा अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)