नृत्याच्या माध्यमातून एमबीए पूर्ण करणारी माधुरी पवार

शाहू कलामंदिरमध्ये आज सातारच्या अप्सरेचा भव्य सत्कार
गुरूनाथ जाधव
सातारा – नृत्याच्या माध्यमातून एमबीए पूर्ण करणारी सातारची अप्सरा माधुरी पवारचा भव्य सत्कार आज शाहू कलामंदीरमध्ये होणार आहे.आज परिस्थिती बेताची आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याच्यावर मात करत लढणाऱ्या सातारा सैदापुरच्या रहिवासी असलेल्या माधुरी पवारची संघर्ष कथा लक्षात घेण्यासारखी आहे.म्हणूनच कोणतेही नृत्यप्रक्षिण न घेता झी युवा वाहिनीवरील रिऍलिटी शोची विजेती ठरलेल्या माधुरी पवारच्या यशाने अनेकांना आनंद झाला.

बुधवार नाका येथील नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण तर करंजे येथील कन्याशाळेत माधुरीने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. माधुरीची आई कल्पना व वडील ज्योतीराम हे गवंडी काम करतात. आपल्या शिक्षणाचा भार त्यांच्यावर पडू नये म्हणून सातारा शहरासह जिल्ह्यात विविध यात्रा, कोजागिरीचे कार्यक्रम, विविध गणेश मंडळे, उत्सव, व नृत्य स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतून केआयटी एम.ई.आर. कोल्हापुर येथून एमबीएचे शिक्षण उच्चश्रेणीमध्ये येऊन एचआर, सिस्टीम विभागात स्पेशलायझेशन केले आसल्याचे माधुरी सांगते. हलाखीची परिस्थिती असताना देखील त्यावर मात करत आपल्या कलेची जोपासना करण्यासाठी वडिलांनी मार्गदर्शन केले. त्यांना नृत्याची असलेली आवड मला देखील आहे हे लहानपणीच ओळखून त्यांनी मला मार्गदर्शन सुरू केले. आज मी जे काही नाचते ते माझ्या वडिलांमुळेच तेच माझे खरे गुरू आहेत,असे ती म्हणते.

अप्सरा आलीच्या परिक्षक सुरेखा पुणेकर यांच्या सीडीज मला वडिलांनी लहानपणी दाखवल्या होत्या. त्या पाहून मी त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे. आता त्यांच्यासमोर नृत्यकला सादर करून महाराष्ट्रात अप्सरा आलीची विजेता ठरली हे स्वप्नवत वाटत आहे. कबड्डी, वक्तृत्व, हिंदी सुलेखन, अशा शैक्षणिक क्रीडा प्रकारात देखील उज्वल यश मिळवत लावणी नृत्यामध्ये विशेष ओळख निर्माण करत आज अप्सरा आलीपर्यंत मजल मारली आहे. दुर्गेशनंदीनी ग्रुपच्या माध्यमातून पती ओंकार भंडारे यांच्याशी ओळख झाली.

ओंकार माझ्या आयुष्यात आले आणि माझे आयुष्य बदलून गेले.आज मी अप्सरा आलीचे विजेती ठरली हे ओंकारमुळेच. त्याचा माझ्यावरचा अतुट विश्‍वास मला खूप मोलाचे सहकार्य व जगण्याचे बळ देतो. झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे या शोमध्ये आमच्या ग्रूपची ओळख महाराष्ट्रात झाली होती. त्यानंतर अनेक वाहिन्यांच्या स्पर्धामध्ये भाग घेतला. मात्र झी युवाच्या अप्सरा आलीने मला साताराची माधुरी पवार ही ओळख निर्माण करून दिली. लग्नानंतरच्या सुरूवातीच्या काळात आपल्या सुनेने नृत्य करायला बाहेर जाऊ नये यामुळे घरगुती वाद झाले. परिणामी घराबाहेर वेगळे राहिलो.

यामध्ये पती ओंकारने माझी साथ सोडली नाही. आम्हाला आमच्या कलेबाबत तसेच आवडीबाबत समजून घेऊन सासू स्वाती विलास भंडारे व दिर निलेश यांनी उशीराने का होईना समजून घेतले. समाजाकडे पाहताना आपली दृष्टी जशी आहे. तसाच समाज आपल्याला दिसतो. त्यामुळे मी कायम सकारात्मकतेने सर्वच बाबींकडे पाहिल्यामुळे अनेक अडचणींच्या काळात देखील मी तरले कधीच हरले नाही. पती, तसेच आई, वडिल, दिर व सासुच्या सहकार्याने मी भविष्यात देखील नृत्यकलेमध्ये अजून दर्जेदार काम करीत राहीन. यासोबतच येत्या काळात चित्रपट, मालिका रिऍलिटी शो नृत्य स्पर्धामध्ये भाग घेतच राहणार असल्याचे माधुरीने सांगितले आहे.

शहरातून भव्य मिरवणूक

आज दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजता देवीचौक ते राजवाडापर्यंत माधुरी पवार हिची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सातारा शाहू कलामंदिरात सायंकाळी 6 वाजता अप्सरा आली विजेती ठरल्याबाबतचा सत्कार व नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. तरी सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओंकार भंडारे व डॉ. रविंद्र भारती यांनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)