वाईत घरफोडी, पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास

वाई – वाई शहरातील रविवार पेठेतील घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह इतर असा सुमारे दोन लाख 86 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी भानुदास गुलाबराव दाभाडे (वय 63) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी, सेवानिवृत्त शिक्षक भानुदास दाभाडे यांचा मुलगा व सुन नोकरीनिमित्तपुणे येथे आहेत. दाभाडे व त्यांची पत्नी वाई येथे रविवार पेठेत वास्तव्यास असून शनिवार 9 मार्च रोजी घराला कुलुप लावून ते मुलाकडे पुण्याला गेले. यावेळी दाभाडे यांच्या पत्नीने स्वत:चे सुनेचे दागिने धान्यांच्या कणगीत ठेवले होते. त्यानंतर दाभाडे हे शनिवार 16 मार्च रोजी एकटेच वाई येथे आले व पुन्हा सोमवार, 18 रोजी पुण्याला गेले. जाण्यापूर्वी त्यांनी दागिने व्यवस्थित असल्याची खात्री केली होती.

दरम्यान, शनिवारी 23 रोजी दाभाडे यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे भाडेकरु एस राजेंद्र यांना दाभाडे यांच्या घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडलेल्या स्थितीत आढळले. त्यानंतर एस. राजेंद्र यांनी तात्काळ पुणे येथे मुलाकडे गेलेल्या दाभाडे यांना या प्रकराची माहिती दिली. त्यानंतर दाभाडे यांनी वाई येथे येऊन घराची पाहणी केली असता दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले.

यामध्ये सोन्याचे गंठण, राणीहार, सोन्याच्या अंगठ्या, चेनी, सोन्याचे टॉप, सोन्याचे वेल, लहान मुलांचे दागिने, चांदीच्या काही मौलवान वस्तू मिळून दोन लाख 86 हजार एकशे पन्नास रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अधिकारी पथकासह दाखल झाले व तपासणी केली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक आर. सी. कदम करीत आहेत.

दरम्यान, शनिवारी झालेल्या या चोरीच्या प्रकारानंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आठवडा बाजारात होणाऱ्या चोऱ्या वाईकर नागरिकांसाठी नवीन नाहीत. मात्र, घराची कुलपे, कडीकोयंदा तोडून झालेल्या या चोरीमुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)