‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांनो पोटा-पाण्याचं बघा

करुणा पोळ

कवठे –
आपलं राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एकमेकांवर टिका करणारे नेते पक्षांची अदलाबदल करुन मांडीला मांडी लावून बसत आहेत. मात्र, त्याच नेत्यांसाठी एकमेकांची डोकी फोडणारे कार्यकर्ते आजही जिथे आहे तिथेच आहेत. त्याचा ना कोणता विकास आहे ना कसली प्रगती. त्यामुळे आता तरी या कार्यकर्त्यांनी धडा घेण्याची गरज असून आपल्या कुटुंबासाठी, पोटापाण्यासाठी जगण्याच शहाणपण अंगीकारण्याची वेळ आली आहे.

कॉंग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात सुजय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि सुजय अहमदनगरच्या तिकिटासाठी भाजप प्रवेश करतो. भाजपमध्ये गेलेल्या सुजय विखे पाटलांवर टीका करताना आपण हे देखील लक्षात घ्यायला हवे की दस्तुरखुद्द राधाकृष्ण विखे पाटील 1995 साली शिवसेनेतून मंत्री झाले होते. सत्तेसाठी त्यांनी तेंव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता आता पोरगा भाजपमध्ये जातोय, याचे नवल नाही. इकडे सुप्रियाताई म्हणतात आमच्या पोरांनी राजकारणात येऊ नये. पवार साहेब म्हणतात सगळे उमेदवार घरातले दिल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं, असं म्हणतात तोवर ‘कार्यकर्त्यांचा आग्रह आहे’ असं म्हणत पार्थ पवारांचं मावळचं तिकीट फायनल होतं.

नारायण राणे भाजपच्या तिकिटावर खासदार होतात, त्यांचे पुत्र कॉंग्रेसचे आमदार असतात, सरकारच्या विरोधात बोलत राहतात. कोल्हापुरात महाडिक साहेब स्वतः कॉंग्रेसमधून विधानपरिषद सदस्य होते. मुलगा भाजप आमदार, पुतण्या राष्ट्रवादीतून खासदार. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून खासदार होते, मंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार होतो, रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार होतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री/खासदार होतात. ही आणि अशी अनेक उदाहरणं सत्ता आणि परिवारवादाची सांगड कशी घातली जाते यासाठी पुरेशी आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 2014 च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापणेच्या वेळी सुरुवातीला भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतात. तर आताची स्थिती तुम्हाला माहिती आहेच. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना गुरू मानतात. राज ठाकरे आधी मोदींचं कौतुक करतात. आता एकही दिवस जात नाही ते मोदींवर टीका करायचा चान्स सोडत नाहीत. हेच राज ठाकरे अजित पवार आणि शरद पवारांवर सडकून टीका करतात. अजित पवार त्यांना बोलघेवडे आहेत असं सांगत त्यांच्यावर पलटवार करतात. (ठाकरे-पवार वाद गुगल करा) त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज ठाकरेंवर तुटून पडतात.

आज राज ठाकरेंचा शब्द याच कार्यकर्त्यांसाठी मोलाचा झालाय. पवार साहेबांच्या मुलाखती काय? भेटीगाठी काय? कार्यकर्त्यांकडून कौतुकाचे सोहळेच होऊ लागलेत. बाकी भाजपमधील इनकमिंग आणि सहयोगी पार्टी शिवसेनेशी असलेली अनोखी ‘प्रेमकहाणी’ सर्वांना परिचित आहेच. त्याबद्दल तर लिहायचीही इच्छा नाहीये इतकं पांचट झालंय, ते ही सर्वश्रुत आहेच. अर्थात हे सर्व कार्यकर्त्यांना माहिती नसायचं अर्थातच कारण नाही. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत राजकीय पुढाऱ्यांच्या सोयीस्कर राज’नीती’ची आणि परिवारावाद भक्कम करणारी. यात खरी फरफट होते ती ‘निष्ठावान’ कार्यकर्त्यांची. ते इमाने इतबारे सतरंज्याच उचलतात. काही प्रत्यक्षात काही या आभासी दुनियेत. एकंदरीत, ही स्थिती पाहता जिवाच्या आकांताने ग्राउंड फ्लोअरवर सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते ते सोशल मीडियातून पुढाऱ्यांच्या उदोउदोत घरदारकडेही लक्ष न देणाऱ्या कार्यकर्त्यांनी सावध व्हायला हवेय. खरोखर कार्यकर्त्यांनी बंद डोळे उघडण्याची गरज आहे. खरतर ही गरज पूर्वापारपासूनचची आहे. कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष होण्याचा काळ आजचा नाहीच. त्याला मोठा इतिहास आहे.

दिवसभर नेत्यांच्या मागे मागे फिरायचं, रुपडी खिशात नाही, मावा, तंबाखू खायची अन सोशल मीडियावर एडिटिंगची ऍप्स इन्स्टोल करून भाऊ, दादांचा धुरळा उडवायचा. पोरांनी राजकीय लोकांची काम करावी पण केवळ खाण्यापिण्यासाठी नको. काहीतरी उद्देश ठेवून काम करावी, त्यांचा ‘आशीर्वाद’ घेऊन सक्रिय राजकारणात जावं. सरळ आपल्या स्वार्थासाठी काम करावं. उद्योग धंदा करून पैसे कमवावा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)