एनबीएफसीमधील भांडवल पेचाचा शेअरबाजारावर परिणाम कायम
मुंबई – बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था समोरील भांडवल असुलभतेचा प्रश्न वाढत चालला आहे. त्यामुळे काल रेपो दरात कपात होऊनही शेअरबाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. आजही निर्देशांकाने बरेच हेलकावे घेतल्यानंतर निर्देशांक काही प्रमाणात वाढले.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 86 अंकांनी वाढून 39,615 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 26 अंकांनी वाढून 11,870 अंकांवर बंद झाला. एनबीएफसीमुळे सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्स 98 अंकांनी तर निफ्टी 52 अंकांनी कमी झाला. आज झालेल्या खरेदीचा फायदा बॅंका आणि वित्तीय संस्थांना झाल्याचे दिसून आले.
याबाबत बोलताना जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, भारताबरोबरच जागतिक विकासदर कमी होत असल्यामुळे गुंतवणूकदारांत संभ्रम आहे. त्यामुळे काही दिवस तरी गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे.
दूरसंचार, ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक 0.79 टक्क्यांपर्यंत वाढले तर ऊर्जा, आरोग्य, धातू क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप आज कमी झाले. काल परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1448 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली त्याचबरोबर देशातील संस्था गुंतवणूकदारांनीही 650 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.