नवी दिल्ली – बंदुकीच्या धाकाने तिघा जणांनी एका कुटुंबाला लुटल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत समोर आला आहे. पहाटे तीन वाजता दोन लहान मुलांसह घरी परतणाऱ्या जोडप्याच्या कारचा आरोपींनी पाठलाग केला. अखेर पार्किंगमध्ये शिरुन त्यांनी केलेल्या लुटीचा थरार घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या प्रकरणी मॉडेल टाऊन परिसरातील रहिवाशी वरुण बहल यांनी तक्रार दाखल केली आहे. वरुण आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह रविवारी पहाटेच्या सुमारास सासुरवाडीहून घरी परत येत होते. घराबाहेर त्यांनी तोंड झाकलेल्या तिघा बंदुकधारींना पाहिले. त्यामुळे घरात शिरण्याऐवजी त्यांनी आपली मर्सिडीज कार पुढे नेली.
घराचे मुख्य गेट सताड उघडे असल्यामुळे त्यांनी गाडी पुन्हा आपल्या घराच्या दिशेने वळवली. कार पार्क करुन वरुण घाईघाईत मुख्य गेट बंद करण्यासाठी धावले. मात्र, तेवढ्यात शिताफीने तिन्ही आरोपींनी गेटमधून आत शिरकाव केला. त्यानंतर घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला असला, तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. यापूर्वीही दिल्लीत लुटीच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.