पुणे – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची पहिली सभा वर्धा तर दुसरी गोंदिया येथे पार पडली. त्यानंतर आज मोदी अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात येणार असून आजच्या सभेत मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीची मोदींची नांदेड येथे होणारी आजची सभा ही महाराष्ट्रातील तिसरी सभा आहे. ही सभा सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मागील दोन सभेप्रमाणे आजही नरेंद्र मोदी यांनी सभेआधी मराठीत ट्विट करत सभेबदल माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “गुढीपाडव्याच्या पवित्रदिनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीचा योग येतोय ! नांदेडमध्ये आज संध्याकाळी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात.
गुढीपाडव्याच्या पवित्रदिनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भेटीचा योग येतोय !
नांदेडमध्ये आज संध्याकाळी आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे.
महाराष्ट्राचे आशीर्वाद नेहमीच आम्हाला मोठे बळ देतात. @BJP4Maharashtra
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2019
तसेच मोदींनी गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या देखील सर्वांना मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी बांधवांना गुढीपाडव्यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
येणारे नूतन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जावो, ही मनापासून प्रार्थना!
— Narendra Modi (@narendramodi) April 6, 2019
दरम्यान, यापूर्वीच्या महाराष्ट्रातील दोन्ही सभेमध्ये मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निशाना साधत टीका केली होती. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेडमध्ये 18 एप्रिलला मतदान होणार आहे.