लोहगड, विसापूर परिसरात बिबट्याचा वावर ?

संग्रहित छायाचित्र...

भितीचे वातावरण : लोहगड रस्त्यावर बिबट्या पाहिल्याचा तरुणांचा दावा

कार्ला – मावळ तालुक्‍यातील जंगलात काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून कार्ला परिसरातील टाकवे- खुर्द भागात बिबट्याची दहशत असतानाच आता भाजे लोहगड परिसरात सुध्दा बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चांनी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्ला येथील काही तरुण लोहगड येथे मंगळवारी संध्याकाळी कार्यक्रमाला गेले असता भाजे लोहगड रस्त्याला बिबट्या दिसून आल्याचे सांगत आहेत. यावरून लोहगड परिसरात देखील बिबट्याचा वावर आहे का? असा प्रश्न पडला असून नागरिक भयभीत झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या दोन महिन्यांपासून कार्ला परिसरातील टाकवे खुर्द येथे बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा होत्या. बिबट्याने या दोन महिन्यातच एक घोडा व एका शेळीवर हल्ला केला असल्याच्या चर्चेने टाकवे ग्रामस्थ भयभीत झाले असतानाच भाजे, लोहगड, विसापूर किल्ला परिसरात बिबट्या दिसून आला आहे.

मंगळवारी रात्री कार्ला येथील युवक सागर हुलावळे, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, राहुल हुलावळे, अक्षय हुलावळे हे लोहगड येथे कार्यक्रमाला गेले असता रात्री घरी परत येत असताना लोहगड रस्यावर त्यांच्या कारच्या समोर बिबट्या येऊन काही वेळ गाडीसमोर थांबला व तेथून झुडपात गायब झाल्याचे सांगितले.

भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता असल्याने अनेक पर्यटक या भागात येत असतात तरी या भागात फिरताना दिसत असतात तरी प्रवास करताना काळजी घ्यावी, असे स्थानिक नागरिकांनी आवाहन केले आहे.

मावळ तालुका हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. मोठी जंगले आणि धरणे या डोंगराळ भागात असल्याने या परिसरामध्ये वन्य प्राण्यांचे दर्शन होत असते. तसेच काही गावे देखील डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत, तर काही डोंगरदऱ्यात अनेकजन वास्तव्य करत आहेत. पूर्वी घनदाट जंगलाने आच्छादलेल्या या परिसरात अनेक वन्य प्राणी राहत असत. कालांतराने वाढत्या नागरीकरणाने त्यांचा अधिवास संपुष्टात येऊ लागला. डोंगरावर व उरलेल्या वन्य परिसरात भक्ष्य आणि पाण्याचा अभाव निर्माण झाल्यास वन्य प्राणी पूर्वी जंगल आणि आता मनुष्य वस्ती झालेल्या परिसरात येतात, असे प्राणी प्रेमी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)