बुलेट ट्रेन ऐवजी लोकल सुधारा! – शरद पवार

प्रातिनिधिक छायाचित्र

शरद पवार ः मुंबईतल्या पुलांची श्वेतपत्रिक काढण्याची मागणी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळून गुरुवारी मुंबईत झालेल्या दुर्घटनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडताना, सव्वा लाख कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन करण्यापेक्षा मुंबईतील लोकलची अवस्था सुधारा, अशा कानपिचक्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्या. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच मुंबईतील सर्व पुलांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी पूल दुर्घटनेवरून राज्य सरकार व महापालिकेवर जोरदार शरसंधान केले. मुंबईत अपघात झाला तो अत्यंत चिंतेचा विषय आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. रोज 1 कोटी लोक उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. मुंबईत दिवसाला सरासरी 15 ते 20 प्रमाणे, वर्षाला 3 हजार लोकांचा बळी जातो. महिन्याला 2-3 हजार प्रवासी जखमी होतात. याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पावलं उचलणं आवश्‍यक आहे.

बुलेट ट्रेनवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च करण्यापूर्वी इथली स्थिती सुधारा, असा सल्ला पवार यांनी दिला. तसेच मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे, अशी मागणी पवार यांनी केली. मध्य रेल्वेने 11 नोव्हेंबर 2015 ला राज्य सरकारला पत्र दिले होते. या पत्रात मुंबईतील ओव्हरब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हे पत्र शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. या पत्रानंतरही सरकारने किंवा महानगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते. तरीही दुर्घटना कशी झाली? असा सवाल करताना, मुंबईतील सर्व पुलांची तपासणी करून श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली.

काटोल पोटनिवडणूकीवर बहिष्कार घालावा !

लोकसभा निवडणुकीसोबतच काटोल विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. नवीन आमदाराला केवळ तीन महिनेच काम करता येणार आहे. मग तीन महिन्यासाठी ही निवडणूक कशाला घेता? असा सवाल करताना ही पोटनिवडणूक रद्द करावी, अशी मागणी पवार यांनी केली. आयोगाने निवडणूक रद्द केली नाही तर सर्व प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारच उभा न करण्याचा निर्णय घ्यावा किंवा सर्वसहमतीचा उमेदवार म्हणून एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास अथवा पत्रकारास बिनविरोध निवडून द्यावे, अशी सूचना पवार यांनी केली.

50 टक्के मतपत्रिकांची मोजणी करा !

मतदान यंत्रांसोबत व्हीव्हीपॅट यंत्रणा बसवण्यात येणार आहे. या यंत्रात मतदान केल्यानंतर ज्या पावत्या जमा होतात, त्यातील केवळ 2 टक्के मतांची मोजणी होते. व्हीव्हीपॅटमध्ये मोजणी केली जाते. त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील किमान पन्नास टक्के मतांची मोजणी केली जावी यासाठी 26 पक्षांच्या वतीने आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. ती न्यायालयाने दाखल करून घेतली असल्याचे पवार यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला येत्या 23 मार्च पर्यंत आपले म्हणणे मांडायला सांगितले आहे अशी माहिती पवार यांनी दिली.

बालकांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका !
शरद पवारांनी माढ्याच्या निवडणुकीतून माघार घेतल्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टोलेबाजीला पवार यांनी आज प्रत्त्युत्तर दिले. बालकांच्या बडबडीकडे मोठ्या माणसांनी फारसे लक्ष देऊ नये, असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला. फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल अशी विधानं करत आहेत. मी त्यांच्या पक्षातील नेत्यांविरोधात निवडणूक लढवल्या आहेत. त्यावेळी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, हे त्यांना कदाचित माहिती नसेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)