संघर्ष जगण्याशी, संघर्ष अभिनयाशी

बारा वर्षानंतर कचऱ्याचीही जागा बदलते, तू तर माणूस आहेस त्यामुळे तुझाही काळ बदलेल. केवळ लढणे थांबवू नकोस, एक दिवस तू नक्कीच यशाच्या शिखरावर पोहचशील. हा आपल्या आईने दिलेला सल्ला शिरोधार्ह मानून प्रचंड मेहनत करण्याचा निश्‍चय मनाशी बाळगून नंबरदार नवाजउद्दीन सिद्दीक्की याने आपले गाव सोडले. बारा वर्ष काय पण पंचवीस-पन्नास वर्ष सुद्धा मेहनत घेण्याची त्याची तयारी होती. मात्र, आपल्याला अभिनय क्षेत्रामध्येच काम करायचे होते, ही खूणगाठ त्याने स्वत:च्या मनाशी बांधून घेतली होती.

आपल्या दर्जेदार अभिनयामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीला प्रेमात पाडणारा एक सृजनशील अभिनेता म्हणजे नवाजउद्दीन सिद्दीक्की. उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते एक प्रतिभासंपन्न अभिनेता ही ओळख निर्माण करण्यास त्याला एका तपाहून अधिक संघर्ष करावा लागला. बालपणी घरी वीज नव्हती. सगळे बालपण कंदिलाच्या उजेडात गेले. नवाज हा विद्यार्थी न अभ्यासात हुशार न खेळात अव्वल. शेवटच्या बाकड्यावर बसून शालेय शिक्षण त्याने पूर्ण केले. आपली पदवी बीएस्सी रसायनशास्त्रात त्याने पूर्ण केली. पदवी झाली म्हणजे आता नोकरी आलीच! म्हणून त्याने एका केमिस्ट कंपनीमध्ये एक वर्ष नोकरी केली. मात्र, मन नेहमी स्वत:च्या शोधात होते. आणि तो शोध अभिनयात आहे, हे त्याला समजले. सर्व सोडून त्याने अभिनय क्षेत्रात आपल्या क्षमतेला आजमाविण्याचे ठरविले. आज त्यात तो यशस्वी आहे. त्याच्या अभिनयाची आज एक वेगळीच छबी चित्रपट सृष्टीवर पडलेली आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून (एनएसडी) अभिनयाचे धडे घेऊनही ज्यावेळी तो कामाच्या शोधात चित्रपट सृष्टीत जात असे त्यावेळी त्याला काय आहे हे एनएसडी? हा प्रश्‍न विचारला जाई. सरफरोश चित्रपटात केवळ चाळीस सेकंदाचा नवाजचा पहिला अभिनय. तो पण चुकून त्याच्याकडे आलेला होता. कारण, तो रोल त्याच्या मित्राला मिळालेला होता पण मित्र उपलब्ध होऊ शकला नसल्याकारणाने तो रोल त्याने केला.

बॉलीवूडमध्ये स्वत:चे नशीब आजमाविण्यासाठी दररोज हजारो कलाकार मुंबईमध्ये दाखल होतात. मात्र, सगळ्यांनाच अपेक्षित यश मिळते असे नव्हे. नवाज याचा संघर्ष अधिक प्रेरणादायी ठरतो कारण, त्याने जगेल तर इथेच आणि मरेल पण इथेच ही भूमिका घेऊन जगण्याचे ठरविले होते. या त्याच्या संघर्षामध्ये त्याला जगण्यासाठी वॉचमन म्हणूनही एक वर्ष काम करावे लागले आहे. अभिनेता म्हणजे दिसायला एकदम सुंदर वगेरे संकल्पना त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बदलून टाकल्या. आज तो नसरुद्दीन शाह, ओम पुरी, इरफान खान, मनोज वाजपेयी या वेगळ्या धाटणीच्या दर्जेदार अभिनेत्यांच्या रांगेमध्ये सामील झाला आहे.

सरफरोशपासून सुरू झालेला चाळीस सेकंदाचा अभिनय ते मिस लव्हली, गॅंग्ज ऑफ वासेपूर, कहानी, लंचबॉक्‍स, तलाश, रमन राघव, मॉम, मांझी, मंटो, ठाकरे आदी चित्रपटातून साकारलेल्या भूमिका भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेल्या.

शानदार, जबरदस्त जिंदाबाद अभिनय करीत नवाजने अभिनय क्षेत्रामध्ये आज आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या त्याच्या संघर्षमय प्रवासात त्याला असंख्य लोकांनी साथ दिली. ज्यांच्याबद्दल तो नेहमी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. अशा कर्तुत्ववान अभिनेत्यास वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)