अरुण गोखले
डॉक्टर तपासणी रुममधून बाहेर आले. बाहेर बसलेल्या मुला मुलींना म्हणाले, “”हे पाहा विशेष चिंता करण्यासारखे काही नाही. श्रीच्या पायाचं हाड थोड डिसलोकेट झालं आहे. प्लॅस्टर घातलय, माहिन्याभरात ठिक होईल. त्याची डोक्याची जखमही काही फार खोल नाही. तो खूप घाबरला होता इतकंच, आता तुम्ही रिलॅक्स व्हा बरं।”
डॉक्टरांचे ते बोलणे ऐकले आणि लगेच रीटा म्हणाली, “”थॅक्स गॉड.”.. सागर मोहन आणि रेश्मा ह्यांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले.
सागरने विचारले, “मोहन तू फोन केला आहेस ना श्रीच्या बाबांना?’
“हो मी फोन केलाय, आम्ही श्रीला दवाखान्यात घेऊन आलो आहोत. तुम्ही या असंही सांगितलंय.’
“अरे ते येतीलच इतक्यात…’
इतक्यात श्रीचे आई बाबा धावत पळत दवाखान्यात आलेच. “रेश्मा काय झालं ग श्रीला?… कसा आहे तो?” त्याच्या आईने विचारले. “आई बाबा… तुम्ही काही काळजी करु नका श्री अगदी ठिक आहे. आताच डॉक्टर सांगून गेले.’ रेश्माने त्यांना सांगितले. रीटा आणि रेश्मा श्रीच्या आईच्या जवळ बसल्या.
बाबा मुलांच्या जवळ येऊन म्हणू लागले, “मुलांनो! अरे मी तुमचे आभार तरी कसे आणि किती मानू? तुम्ही तुमच्याकडचे पोॅकेटमनीचे पैसे वापरलेत, श्रीला दवाखान्यात आणलेत. वेळीच उपचार करवलेत. मी खूप खूप आभारी आहे तुमचा.”
त्यावर सागर म्हणाला, “बाबा अहो तुम्ही कशाला आमचे आभार मानताय. अहो, ते तर आमचं मित्रकर्तव्यच होतं.हां आता तुम्ही जर त्या पॉकेटमनी बद्दल म्हणत असाल ना तर एक सांगू? माझे बाबा नेहमी सांगतात. मुलांनो! तुम्हाला दिला जाणारा पॉकेटमनी हा तुमच्या गरजा भागविण्यासाठी वापरायचा असतो. तो गरजेसाठी असतो चैनीसाठी नाही. तुम्हाला कधी अडीअडचण येऊ शकते, काही तरी घेणं करणं आवश्यक असते. त्यासाठी त्या पॉकेटमनीचा तुम्ही योग्य असा विनियोग करायचा असतो. कोणतीही आवश्यक ती गरज भागवणे हे पैशाचं खरं महत्वाच काम आहे. होय ना? आम्ही तेच केल इतकंच.”
सागरचे ते विचार आणि मित्रांनी पार पाडलेलं ते मित्रकर्तव्य याने श्रीच्या बाबांना खूप आनंद झाला. सर्वांचं कौतुक करीत ते म्हणाले, “मुलांनो! तुम्हाला पैशाचा खरा अर्थ कळाला आहे. पैशाचा योग्य वापर हेच त्याचं मोल आहे.”