थेरगाव – शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीसंदर्भात अग्निशामक दल आणि पोलीस दलाला माहिती देऊन चाळीत राहत असलेल्या 28 कुटुंबांना तात्काळ मदत मिळवून देण्याची तत्परता ऋषिकेश काशिद यांनी दाखविल्याने जीवितहानी टळली.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास थेरगाव येथील पाषणकर चाळीमध्ये अचानक शॉर्टसर्कीट झाले. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती देवूनही त्याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. यानंतर ऋषिकेश यांनी तात्काळ अग्निशामक दल व पोलीस यंत्रणेला याबाबतची माहिती दिली. तसेच आजूबाजूच्या नागरिकांची मदत घेत चाळीत राहणाऱ्या 28 कुटुंबातील शंभरहून अधिक नागरिकांना बाहेर काढले. शिवाय घरातील गैस सिलेंडरही बाहेर काढून दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेतली. पोलीस व अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दीड तास परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान दीड तासानंतर पोहोचलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाह बंद केल्याने संभाव्य धोका टळला. ऋषिकेश यांनी नागरिकांना बाहेर काढल्यामुळे दुर्घटना टळली.