जीवनगाणे: माणूस म्हणून जगा…

अरुण गोखले

परवा एका व्याख्यानाला गेलो होतो. विषय होता मी आणि माझं सामाजिकतेच भान”. त्या विषयावरचे आपले विचार प्रभावी भाषेत मांडल्यावर वक्‍त्यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट एका छोट्याशा संदेशाने केला. ते म्हणाले, आपण माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. त्याचं काय आहे आपण सर्वजण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. उद्या मरतानाही आपण माणूस म्हणूनच मरणार आहोत. पण त्या जन्म आणि मरणाच्या मधल्या टप्यात म्हणजेच आपण आपल्या जीवनात माणूस म्हणून किती जगतो याला फार मोठे महत्त्व आहे.

माणूस म्हटला की त्याला स्वाभाविकपणे स्वार्थ, लोभ, अहंकार आणि मीपणा हा असणारच. पण तो त्याच्याच माणूसपणाला घातक ठरेल इतका नसावा. म्हणजे काय तर त्याने घरात, समाजात वावरताना स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करायला हवा. स्वत:च्या सुखाने आनंदी होताना, तुम्ही इतके धुंद होऊ नका की तुम्हाला दुसऱ्याच्या सुख दु:खात आपणही सहभागी व्हावे असे वाटू नये.

सुखाचे क्षण हे एकमेकांना दिल्याने त्यांचा आनंद हा नकळत द्विगुणित होत असतो. दु:ख हे वाटलं की त्याची तीव्रता कमी होते. दुसऱ्याच्या सुख दु:खात सहभागी होऊन आपण त्याच्या सोबत उभे राहिलो ना! की नकळत आपलं आणि त्याच एक नातं गुंफलं जात. कोणीतरी माझा आहे ही जाणीवच प्रत्येकाला जगण्याची, झगडण्याची, जिंकण्याची उमेद देत असते.
दुसऱ्याला मदत केल्याने आपल्याला मिळणारे समाधान. दुसऱ्याची भूक भागविल्या नंतर आपल्या अंतरंगातून येणारी तृप्तीची ढेकर, दुसऱ्याचे आंसू पुसल्यावर आपल्या गालावर उमटणारे हांसू हे अनुभवून तर पाहा.

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे… हा तर साधा माणुसकीचा सांगावा आहे. पण आपण जर आपल्याच स्वार्थापायी ही माणुसकीच विसरणार असलो तर मग आपल्या त्या माणूस म्हणून जगण्याला तरी काय अर्थ आहे?

आपण प्रेमाने एखाद्याच्या पाठीवर ठेवलेला हात. कौतुकाने थोपटलेली पाठ, निस्वार्थपणे केलेली कोणत्याही स्वरुपातली मदत. मी आहे तुझ्या पाठीशी या शब्दांनी दिलेला भरंवसा त्या जीवाला सुखवून जातो, एक आधार देऊन जातो. या गोष्टीं जाता जाता आपल्यालाही एक सहृदयी माणूस म्हणून माणसांच्या जगात मोलाचं स्थान देऊन जातात, हे विसरुन चालणार नाही. त्यासाठी सामाजिकतेचं भान राखत आपलं माणूसपण टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा लागतो इतकचं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)