त्यांच्याविरोधातील मोहिमांसाठी सुरक्षा दले सज्ज
नवी दिल्ली -काश्मीर खोऱ्यात सक्रिय असणाऱ्या 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी सुरक्षा दलांनी तयार केली आहे. आता त्यांना पकडण्यासाठी किंवा त्यांचा खात्मा करण्यासाठी लवकरच विशेष मोहिमा हाती घेण्यात येणार आहेत.
जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर, निमलष्करी दले आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित यादी बनवण्यात आल्याचे मंगळवारी उच्चपदस्थ सुरक्षा सुत्रांनी सांगितले.
त्या यादीत पहिल्या क्रमांकावर हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या रियाझ अहमद नायकू याचे नाव आहे. यादीत मोहम्मद अश्रफ खान, मेहराजुद्दीन, सैफुल्ला मिर उर्फ डॉक्टर सैफ, अर्शैद उल् हक आणि एजाज अहमद मलिक या हिज्बुलच्या इतर दहशतवाद्यांचाही यादीत समावेश आहे. जैश-ए-महंमदचा काश्मीर खोऱ्यातील म्होरक्या हाफिज उमर आणि त्या संघटनेचा आणखी एक सदस्य झाहिद शेख उर्फ उमर अफगाणी हेही सुरक्षा यंत्रणांना हवे आहेत.
हाफिज हा पाकिस्तानी नागरिक आहे. त्याशिवाय, लष्कर-ए-तोयबाचा वासीम अहमद उर्फ ओसामा आणि अल् बद्रचा जावेद मट्टू यांची नावेही मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यादीतील सर्व दहशतवाद्यांना लक्ष्य करून सुरक्षा दले लवकरच विशेष मोहिमा सुरू करतील, असेही सुत्रांनी स्पष्ट केले.