लिंब ग्रामपंचायतीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा

सरपंचपदासह 14-3 ने विरोधी भैरवनाथ अजिंक्‍य पॅनलचा धुव्वा

सातारा – संपूर्ण सातारा तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि राजकीय हेवेदाव्यांमुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या लिंब ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने सरपंचपदासह 17 पैकी 14 जागा जिंकून ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला. आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या अजिंक्‍य ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद सत्ता खेचून विरोधी भैरवनाथ अजिंक्‍य पॅनलचा धुव्वा उडवला.

अतिशय चुरशीच्या आणि लक्षवेधी झालेल्या लिंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, ज्ञानदेव वणवे, माजी सरपंच आनंदराव सावंत, प्रकाश शिंदे आणि
पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्‍य ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह 14 जागांवर विजय मिळवा. पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार अनिल सोनमळे यांनी विरोधी पॅनलचे उमेदवार राहुल पाटील यांचा 1300 मतांच्या फरकाने पराभव केला. अजिंक्‍य ग्रामविकास पॅनलचे सदस्यपदाचे उमेदवार दादा बरकडे, मानसिंग सावंत, रामदास सोनमळे, वंदना सावंत, रेश्‍मा निकम, सुबोध भोसले, उज्ज्वला शिंदे, तुळसबाई सरगर, घनश्‍याम सावंत, राहुल सावंत, सुमन सोनमळे, रवींद्र शिंदे, आशा धुमाळ, विमल सावंत यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला.

निकालानंतर नूतन सरपंच, पॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी सुरुची निवास्थानी जाऊन गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला. नूतन सरपंच आणि सदस्यांचा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पॅनलचे प्रमुख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे करून गावाचा कायापालट करावा. राजकारण हे निवडणुकीपुरते असते. त्यामुळे निवडणूक संपली असून कोणताही गटतट असा भेदभाव न ठेवता सर्वांनी मिळून ग्रामस्थांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)