वाऱ्याच्या झोतानेही होतेय वीज गायब

पाटण तालुक्‍यात महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार

बी. ई. च्या जागी डिप्लोमा होल्डर

पाटणमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा नमुना सध्या कार्यालयात पहावयास मिळत आहे. पाटणसाठी महावितरणच्या उपविभागाचा कारभार सध्या डिप्लोमा होल्डर असणाऱ्या प्रशांत कांबळे यांच्याकडे आहे. तर ते पाटण शहराचे महावितरण कंपनीचे शाखाधिकारीही आहेत. मात्र महावितरणच्या उपविभागाचा कारभार पाहण्यासाठी डिग्री असलेल्या अधिकाऱ्यांची आवश्‍यकता असताना प्रशांत कांबळे यांच्याकडे कार्यभार असल्याने ग्राहकांमधून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. यामुळेच तालुक्‍यात महावितरणची अशी आवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

पाटण – पाटण तालुक्‍यात महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. तालुक्‍याच्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून महावितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारा आला की वीज गायब हे समीकरणच जणू पाटण तालुक्‍यात निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक वैतागून गेले आहेत.

तालुक्‍यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस पडत आहे. मात्र या पावसाची सर्वाधिक ऍलर्जी महावितरण कंपनीला झाली असून पाऊस सोडाच साधा वारा आला तरी महावितरण कंपनीची वीज गायब होत आहे. पाटण शहारासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागात हेच चित्र असून महावितरण कंपनीच्या एका अधिकाऱ्यामुळे ग्राहकांना या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे.

तालुक्‍यातील मोरगिरी, मणदुरे, चाफोली, सडावाघापूर तसेच कोयना विभागात सध्या वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. काही गांवामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज नसल्याचे चित्र आहे. महावितरण कंपनीचे काही अधिकारी कार्यालयात “कलेक्‍टर’चे काम करत असल्याने वारंवार खंडित होणारी वीज या अधिकाऱ्यांना दिसत नसावी, असा ग्राहकांचा आरोप आहे. ग्राहकांना अखंडित वीज देण्याऐवजी हे महाशय ग्राहकांचा खिसा कापण्यात व्यस्त आहेत. मिटर बदलण्यासाठी, शेती पंपाला वीज जोडण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी ग्राहकांना वेठीस धरण्यात येते. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना काम होण्याशी कारण असल्याने या प्रकाराची कोणाकडे वाच्यता केली जात नाही.

तालुक्‍यात महावितरण कंपनीच्या कारभाराबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असताना कोणत्याही उपाययोजना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केल्या जात नसल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी लाइनची कामे करण्याची आवश्‍यकता असताना ती कामे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाहीत. यामुळेच तालुक्‍याच्या ग्रामीण भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

महावितरण कंपनीने वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या प्रश्‍नासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात. तालुक्‍यात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. ग्रामीण भागात तर विजेची परिस्थिती गंभीर आहे. आठ-आठ तास वीज गायब असते. यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास महावितरण कंपनीने जबाबदारी घ्यावी.

प्रशांत पाटील , पाटण तालुका अध्यक्ष, किसान मोर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)