नगर – विजेची तार तुटल्याने दुपारनंतर सुमारे चार तास वीज गायब झाल्याने सिव्हील हाडको परिसर आणि गुलमोहोर रस्त्याचा काही भागात विजेचा खेळखंडोबा झाला. एमआयडीसी परिसरातील फिडर मधून याभागास विजेचा पुरवठा होत असल्याने तेथूनच या भागातील विद्युतपुरवठा बंद करण्यात आला होता.
दुपारी तीनच्या दरम्यान गंगा उद्यान परिसरातील वीजेची तार तुटली. सुदैवाने कोणतीही जानी झाली नाही मात्र सिव्हील हाडको आणि गुलमोहोर रस्त्याच्या काही भागात वीज गेली. गंगा उद्यान परिसरातील व सिव्हील हाडको परीसरातील व्यापारी आस्थापनांना याचा फटका बसला. त्यातच पावसाळी वातावरण भरून आल्याने हवेतील उष्मा वाढला होता. दुपारभर या परीसरातील नागरिकांना उकाडा सहन करावा लागला.
विद्युत विभागाच्या अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. मात्र या भागातील वीजेच्या तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची यापूर्वीच छाटणी करण्यात आली असून आजच तार तुटण्याचा प्रकार हा निव्वळ तांत्रिक भाग असल्याचे सांगितले. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात आला. संध्याकाळच्या आत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने परीसरातील नागरिकांनी सुुस्कारा सोडला.