पणजी: दक्षिण गोव्यातील काब-द-राम किल्ल्या शेजारील खडकावरुन घसरून समुद्रात वाहून गेलेल्या लष्कराच्या जवानाला कोस्ट गार्डच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूपपणे वाचवण्यात यश मिळवले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
दृष्टी लाइफ गार्ड संस्थेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूर उत्तर प्रदेश येथील लष्कराचे लेफ्टनंट शिवम तिवारी हे काब-द-राम किल्ल्याजवळील समुद्राशेजारील खडकावर बसून समुद्राचे दर्शन घेत होते. दरम्यान त्यांचा खडकावरुन पाय घसरला आणि ते समुद्रात फेकले गेले. वायूच्या परिणामामुळे सध्या समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे तिवारी वाहत लाटांसोबत समुद्रात ओढले गेले. तेथील लोकांच्या दृष्टिस ही घटना पडताच कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.
दुपारी 12 वाजता तिवारी समुद्रात वाहून गेल्याची खबर मिळताच कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने तब्बल दोन तासांचे शर्थीचे प्रयत्न करून वाचवण्यात बचाव यंत्रणेला यश मिळाले. समुद्र खवळलेला असल्याने राज्यातील सगळ्या किनाऱ्यांवर समुद्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.