जीवनगाणे : मीठाची गोष्ट 

अरुण गोखले 

“सागर, चला या जेवायला, आजोबांनाही बोलावं, पानं वाढलीत म्हणावं…’ सुनबाईचे बोलणे ऐकले आणि आजोबा आणि नातू दोघेही जेवायला येऊन ताटावर बसले. आजोबांनी ताटाभोवती पाणी फिरविले, देवाला हात जोडले आणि त्यांनी जेवायला सुरूवात केली. “सागर.. अरे सुरूवात कर ना जेवायला. शाळेत जायला उशीर होईल हं तुला?’ आई म्हणाली. त्याने जेवायला सुरूवात केली आणि पहिल्याच घासाबरोबर तो ओरडला, “आई काय हे भाजीत साधे मीठही नीट घातले नाहीस का?’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“अरे बापीश… राहिले का? सॉरी हं.’ असं म्हणत आईने भाजीच्या कढईत मीठ घातले, ती ढवळली आणि त्याच्या पानात वाढली. कसे बसे चार घास घाईघाईने खाऊन सागर स्कूलबसची वेळ झाली म्हणून पळाला. सुनबाईने पाहिले नाना शांतपणे जेवत होते. ती म्हणाली, “नाना!… सागरच्या नादात तुम्हाला विचारायचेच राहून गेले…. चुकले माझे…’ तेव्हा तिला समजावीत नाना म्हणाले, “सीमा! तू नको मनाला लावून घेऊस. अग होत घाई गडबडीत. त्यात बोलून काय दाखवायचं? पानात मीठ वाढलेलं होतचं ना… घेतलं स्वत:चे स्वत: लावून तर बिघडले कुठे?’

नाना सुनबाईला समजावीत होते. पण त्यांच्या मनात खरी खळबळ चालली होती ती या विचाराने की आम्हीच कुठे आमच्या नव्या पिढीवर संस्कार करायला कमी पडतोय का? का आईने मुलाला सॉरी म्हणावे! इतके आम्ही सु-शिक्षित झालो आहोत? ते काही नाही.. हे असं होता कामा नये…’ नानांनी मनाशी निर्णय केला.

रात्री सागर जेव्हा त्यांच्या खोलीत आजोबा गोष्ट सांगा ना? म्हणून आला. तेव्हा त्यांनी तीच “श्‍यामची आई’ पुस्तकातली आळणी भाजीची गोष्ट मुद्याम सांगितली. श्‍यामच्या आईच्या हातूनही भाजीत मीठ घालायचे राहून जाते. पण त्याबद्दल ना श्‍यामचे वडील आईला जाब विचारीत, किंवा मुलेही काहीही न बोलता ती भाजी तशीच गपचूप खातात. एखाद्या वेळी चुकून भाजी जरी आळणी झाली असेल तर पानातलं मीठ लावून घ्यावं. त्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं मन दुखावण्यात काय अर्थ आहे? हा भाग नानांनी प्रभावीपणे सागरला सांगितला. दुसऱ्याच क्षणी त्याने जाऊन सकाळच्या कृतीबद्दल आईची क्षमा मागितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)