लेटर्स फ्रॉम इजिप्त : व्हॅली ऑफ किंग्जची सफर : भाग 2

-श्‍वेता पटवर्धन

लक्‍सोर, इजिप्त

प्रिय जिज्ञासा,

तुला माझे मागचे पत्र आठवते का? मी त्यामध्ये लक्‍सोरमधल्या “व्हॅली ऑफ किंग्ज’बद्दल लिहिले होते. तिथे फेरोंनी आपल्या हयातीत अतिशय देखण्या कबरी बांधून घेतल्या होत्या. त्या कबरी फेरो आपल्या हयातीत बांधायला सुरुवात जरी करत असले तरी त्यांचे बहुतेक काम त्यांच्या मृत्यूनंतर केले जायचे.

आपल्या हयातीत आपलीच कबर पूर्ण करणे अपशकुन मानले जाई. त्यामुळे फेरो जागा निश्‍चत करून काम सुरू करत; पण त्यांच्या मृत्यूनंतर ममी बनेपर्यंत 70 दिवसांत ती कबर पूर्ण करावी लागे. एकदा ममी त्यामध्ये ठेवली की, कबरीचे दार बंद केले जाई, ते परत कधीही न उघडण्यासाठी.

त्यामुळे काही कबरी घाईगडबडीत पूर्ण केल्या गेल्या आहेत, तर काही अपूर्ण आहेत. आता याला दुसरा मतप्रवाह असा देखील आहे की, काही फेरो अकाली मरण पावल्यामुळे त्यांच्या कबरी अपूर्ण राहिल्या. नंतरच्या काळात या कबरींमधील खजाना, ममीज सगळे चोरीला गेले. कितीही गुपित ठेवले, पुरून ठेवले तरी रहस्य बाहेर येते हेच खरे! खरे ना?

मागच्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, येथील असंख्य कबरींमधील 63 आजपर्यंत सापडल्या आहेत. अजून कित्येक पृथ्वीच्या पोटात गुप्त असाव्यात; परंतु सर्वांत महत्त्वपूर्ण शोध तुतानखानुम नावाच्या फेरोच्या कबरीचा होता. हावर्ड कार्टर हा इंग्लिश आर्कीयोलोजिस्ट बरीच वर्ष “व्हॅली ऑफ किंग्ज’मध्ये उत्खनन करत होता.

कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर 1922 साली त्याला मोठे यश मिळाले. त्याला तुतानखानुमची कबर नुसतीच सापडली नाही, तर ती ज्या अवस्थेत कित्येक शतकांपूर्वी बंद केली होती, त्याच अवस्थेत सापडली. “व्हॅली ऑफ किंग्ज’मधील ही आजपर्यंत सापडलेली एकमेव कबर आहे जिने चोरांना लीलया चकवले. यामधील खजाना आणि तुतानखानुमची ममी सुरक्षित सापडली. ती ममी आता कायरोमधील संग्रहालयात ठेवली आहे.

या कबरीमध्ये सापडलेला खजाना फेरोचा कमी, तर कुबेराचाच अधिक वाटावा. जिज्ञासा, ज्या फेरोच्या खजानाने जगाची झोप उडवली, तो फेरो केवळ 18 वर्षे जगला आणि त्याने 11 वर्षे राज्य केले. मग रामसीस-खख सारख्या 90 वर्षांचा जीवनकाल असणाऱ्या फेरोकडे किती संपत्ती असेल, याची (दुर्दैवाने) आपण फक्‍त कल्पनाच करू शकतो.

“व्हॅली ऑफ किंग्ज’ ही आजच्या घडीला इजिप्तमधील पिरॅमिड्‌स पाठोपाठ दुसरे सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारे स्थळ आहे. तेथील एका तिकिटावर आपण तीन कबरी पाहू शकतो. त्यामुळे पर्यटक म्हणून तिथे गेल्यावर कोणत्या तीन कबरी पहायच्या हे व्यवस्थित ठरवावे लागते.

त्यासाठी एखाद्या गाईडची मदत घेतलेली उत्तम. आता तू म्हणशील की, त्या 3 मधली तुतानखानुमची कबर तर नक्‍की आहे. पण त्या कबरीचे तिकीट वेगळे घ्यावे लागते आणि ते साध्या तिकिटाच्या किमतीच्या दुप्पटहून अधिक आहे. पण हावर्ड कार्टरने आपल्याला इतके मोठे आश्‍चर्य खुले करून दिले आहे की, पर्यटक असेल ती किंमतही मोजायला तयार होतात.

“व्हॅली ऑफ किंग्ज’प्रमाणे लक्‍सोरमध्ये राणीवशाने “हम भी कुछ कम नहीं’ म्हणत “व्हॅली ऑफ क्वीन्स’मध्ये स्वतःच्या कबरी खोदून घेतल्या आहेत. साधारण 100 च्या आसपास कबरी असलेल्या या स्थळी राण्यांबरोबर राजकुमारी आणि राजकुमारांच्या ममीजदेखील पुरल्या गेल्या.

पर्यटक मात्र “व्हॅली ऑफ क्वीन्स’पेक्षा “व्हॅली ऑफ किंग्ज’ला जास्त पसंती देतात. त्यामुळे मी देखील तेच केले. अशाच एका राणीने “व्हॅली ऑफ किंग्ज’च्या मागे स्वतःचे देऊळ बांधून घेतले. त्याची गोष्ट मोठी रोमहर्षक आहे पण ती मी पुढच्या पत्रासाठी राखून ठेवते आहे.

तुझी,
प्रवासी मावशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)