लेटर्स फ्रॉम इजिप्त : इजिप्शियन लोकं…

-श्‍वेता पटवर्धन

प्रिय जिज्ञासा,

फेरोंच्या या प्राचीन देशाला रामराम ठोकण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. तेव्हा हे माझे इजिप्तचे शेवटचे पत्र. आता आज मी कोणत्या पर्यटनस्थळाबद्दल लिहिणार याची तुला उत्सुकता असेल; पण आजच्या पत्राचा विषय मागच्या पत्रांपेक्षा एकदम वेगळा आहे. एखादी जागा नावारूपाला येते ती तिथल्या लोकांमुळे.

“पीपल मेक अ कंट्री’ असे आपण म्हणतोच. त्यामुळे एखाद्या नवीन देशात गेल्यावर सर्वात महत्त्वाचे असते ते तिथल्या लोकांशी बोलणे, त्यांचे निरीक्षण करणे. इजिप्तमधील लोकांशी संवाद साधणे कर्मकठीण होते. कारण ते फारसे इंग्लिश बोलत नाहीत; परंतु इतक्‍या कमी कालावधीत, मोजक्‍या प्रसंगातून मला इजिप्शियन लोकांनी अचंबित केले.

माझ्या आजपर्यंतच्या प्रत्येक प्रवासानंतर पूर्वग्रह कसे चुकीचे असतात हे मी शिकत आले आहे आणि तरीसुद्धा माझे मन पूर्वग्रह बांधणे काही सोडत नाही. इजिप्तला जाताना मनात बऱ्याच शंका होत्या, थोडी धाकधूकदेखील होती. त्यांच्याकडचे नियम कसे असतील, वेगळ्या धर्माच्या लोकांचा ते स्वीकार करतील का, तिथे जाणे सुरक्षित आहे ना, एक ना अनेक प्रश्‍न होते. परंतु तिथल्या लोकांच्या वृत्तीने मी थक्‍क झाले. त्यांना इंग्लिश येत नसूनही त्यांना मदत करायची इच्छा होती.

हेल्प, हेल्प एवढे बोलून ते मदतीला धावून येत होते. इंग्लिश येत नसेल तर आपली समस्या समजून घेण्यासाठी इंग्लिश येणारी व्यक्‍ती शोधत होते. केवळ करायला हवी म्हणून करू मदत, असा भाव नव्हता. त्यांना मनापासून मदत करायची होती. परंतु दुर्दैवाने हे सगळे अनुभव मला शहरात आले. पर्यटनस्थळांवर सगळे व्यापारी आपल्याला फसवायलाच बसलेले असतात जणू. कोणत्याही गोष्टीची किंमत सांगताना अव्वाच्यासव्वा वाढवून सांगितली जाते.

तुम्ही नुसते त्यांच्याकडे, त्यांच्या दुकानाकडे किंवा त्यांच्या घोडागाडी/टॅक्‍सीकडे पाहिले की ते लागलेच तुमच्या मागे ती वस्तू विकत घ्यावी म्हणून पिच्छा पुरवतात; परंतु त्याचे कारण कळल्यावर ही गोष्ट पचवणे मला सोपे गेले. 2011 साली इथे क्रांती झाली तेव्हा इथली अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव इथले पर्यटन ठप्प झाले होते. अशावेळी या वाळवंटातील लोकांना दुसरा उद्योग राहिला नाही आणि कित्येक लोक बेकार झाले.

आता हळूहळू पर्यटन वाढते आहे; पण अजूनही ते पूर्वीसारखे जोमात चालत नाही. त्यामुळे ग्राहक मिळाला की हे लोक शक्‍य तेवढे पैसे उकळतात, मग त्यासाठी त्यांच्याकडे विविध मार्ग आहेत. जसे वाढीव किंमत सांगणे, इजिप्शियन पाउंड न म्हणता (ब्रिटिश) पाउंड म्हणणे, मी आधी ही किंमत सांगितलीच नव्हती अशी बतावणी मारणे. ही पत्रमाला संपवताना एक छोटीशी गंमत सांगते. भारत म्हटले की, यांना बॉलीवूड आठवते. सगळे भारतीय पुरुष यांच्यासाठी अमिताभ बच्चन, शाहरुख खान किंवा सलमान खान आहेत. इतर देशांप्रमाणे इथेही बॉलीवूडची प्रचंड क्रेझ आहे.

ते आपल्याला भारतीय म्हणून ओळखतात आणि “हे इंडियन कम हिअर’ अशीच हाक मारतात. हे पत्रातून बोलणे मला खूप आवडते आहे. पण त्याचबरोबर तुला भेटायची पण तितकीच ओढ लागली आहे. तेव्हा उरलेल्या गप्पा, फोटो आणि विकत घेतलेली गिफ्ट्‌स आणि मिठाई घेऊन मी तुला प्रत्यक्षच भेटणार आहे.

सी यू सून
तुझी, प्रवासी मावशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)