लेटर्स फ्रॉम इजिप्त: हतशेपसुत टेम्पल

श्‍वेता पटवर्धन

लक्‍सोर, इजिप्त
प्रिय जिज्ञासा

व्हॅली ऑफ किंग्स, ज्याच्याबद्दल मी मागच्या दोन पत्रात सविस्तर लिहिले आहे, त्या दरीच्या दुसऱ्या बाजूला टेम्पल ऑफ हतशेपसुत आहे. व्हॅली ऑफ किंग्स पाहून परत येताना मी तिथे गेले. हतशेपसुत ही इजिप्तमध्ये राज्य केलेली दुसरीपण सर्वात लोकप्रिय राणी. तिने स्वतःची कबर आणि देऊळ एकाच ठिकाणी बांधण्याचा ध्यास घेतला. या देवळाचे स्थापत्यशास्त्र देखील वैशिष्ठ्‌यपूर्ण आहे. एकतर आजही, इतकी पडझड झाल्यानंतर, ते देऊळ पाहताना त्याची भव्यता आपल्याला जाणवल्याशिवाय राहात नाही. शिवाय मागे शाश्‍वत आणि रुबाबदार डोंगराची पार्श्‍वभूमी असल्याने ते अजूनच बहारदार दिसते. त्याची रचना आपल्याला प्रामुख्याने ग्रीक आर्किटेक्‍चरची आठवण करून देते – लांब आडवे बांधकाम, त्याच्या मधोमध जिना, मोठमोठे खांब. या देवळाला तीन मजले होते आणि प्रत्येक मजल्याचे काहीतरी वैशिष्ठ्य्‌ होते. परंतु दुर्दैवाने आज फार काही राहिले नाही. त्या काळातील जीवन, व्यापार दाखवणारी काही भित्तीचित्र आहेत. पहिल्या मजल्यावर अजूनही हतशेपसुतचे मोठमोठे पुतळे आहेत.

हतशेपसुतने एवढे मोठाले पुतळे का बांधून घेतले हे आपण थोडा इतिहास वाचल्यावर आपल्याला लगेच कळते. इजिप्त पुरुषप्रधान देश होता. त्यामुळे स्त्रिया राज्य करत नसत. परंतु हतशेपसुत तिच्या नवऱ्याच्या पश्‍चात तिच्या दोन वर्षांच्या मुलाला राजा बनवून त्याच्या वतीने राज्यकारभार करू लागली. सात वर्षांनंतर मात्र तिने स्वतःला फेरो घोषित करून फेरोची मानचिन्ह परिधान केली. त्याकाळी पुरुषप्रधान संस्कृतीची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलेली असताना, तिने हे धाडस केले. परंतु ही शूर फेरो (तिला राजाच म्हणत. कारण राज्य करणारी त्यांच्यासाठी राणी नव्हतीच आणि त्यासाठी त्यांच्याकडे शब्दही नव्हता) नुसते धाडस करून थांबली नाही तर तिने ते यशस्वीपणे तडीस नेले. तिचा कार्यकाळ इजिप्तच्या इतिहासातील सर्वोत्तम मानला जातो. त्यावेळी राज्यात शांतता आणि सुरक्षितता होती तसेच तिने व्यापारोद्योग वाढवला. परंतु हे सर्व करणे तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. ती राजाची मुलगी, बायको आणि बहीण असल्यामुळे ती स्वतःला देव समजे आणि तिने स्वतःला देवांच्या राजाची राणी घोषित केले. हतशेपसुत टेम्पलमध्ये देवांचा राजा अमुन-रेयाचे आश्रयस्थानसुद्धा तिने बनवून घेतले.

परंतु दुर्दैवाने तिला हे कळले नाही की देवाची बायको होण्याने ती अजरामर होणार नाही तर तिच्या कर्तृत्वाने ती अजरामर होईल, जशी ती आज झाली आहे. तिच्या मृत्यूनंतर तिच्या सावत्र मुलाने तिच्यावरच्या असूयेपोटी तिचे नाव इतिहासातून पुसून टाकण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने या देवळाला बरीच इजा केली. तिचे पुतळे खराब केले.

काळाच्या ओघात हे देऊळ जमिनीखाली गाडले गेले पण सुदैवाने पोलिश आर्किओलोजिस्टना ते पुन्हा सापडले. या वास्तूचे बरेच नुकसान झाले असली तरी आज आपण या राणीच्या शौर्याचे हे प्रतीक याची देही याची डोळा पाहू शकतो; परंतु या वस्तूचे भाग्य इतके वाईट आहे की जसे तिच्यावर पुराणकाळात आघात झाले तसे आधुनिक काळातही झाले. 1997 साली इथे आतंकवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये 62 निष्पाप पर्यटकांना निष्कारण आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर हे देऊळ पर्यटकांसाठी बंद केले गेले होते; परंतु आता ते पुन्हा खुले करण्यात आले आहे. भविष्यात या अद्‌भुत वास्तूला कोणाची नजर लागू नये आणि जास्तीत जास्त पर्यटकांना हे देऊळ पाहता यावे हीच माझी ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.
तुझी
प्रवासी मावशी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)