-श्वेता पटवर्धन
प्रिय जिज्ञासा,
लक्सोरमधील पर्यटन संपवून मी आता कायरोला परत आले आहे. इजिप्तमध्ये उतरले ती कायरोमध्ये. हातात फक्त एक दिवस होता. न राहवून आधी पिरॅमिड्सना गेले. पिरॅमिड्सबद्दल तर मी तुला सविस्तर पत्र लिहिले आहेच.
कायरोच्या दुसऱ्या टप्प्यात मी कायरोमधील इतर पर्यटनस्थळे पहिली. कायरोलक्सोरच्या अगदी विरुद्ध आहे. वाळवंट असल्यामुळे प्रचंड धूळ, टोकाचे हवामान आणि इजिप्तमधील अर्ध्याहून जास्त लोकसंख्या या एका शहरात राहात असल्यामुळे खूप गर्दी. कायरो शहर बरेच मोठे आहे. मूळ कायरोमध्ये बहुतेक करून ऑफिसेस आहेत. त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी नगरे वसली आहेत जिथे लोक राहतात.
“कायरोला सिटी ऑफ थाउजंड मॉस्क्स’ म्हणतात इतक्या मोठ्या संख्येत तिथे मशिदी आहेत. कायरोमधील सीतादेलमध्ये (किल्ला) तर मशिदी आहेतच पण वरून कायरोकडे पहिले तर सर्वत्र मशिदींचे मिनार दिसतात. कायरोवर अरबांप्रमाणे ख्रिश्चनही राज्य करून गेले. त्यामुळे चर्च बांधून त्यांनी या शहरावर स्वतःची छाप देखील सोडली. त्यापैकी एक चर्च जमिनीखाली आहे.
येशू ख्रिस्त क्रुसिफिकेशनच्या आधी तीस दिवस या चर्चमधील तळघरात होते, असे म्हणतात. या चर्चपासून जवळच एक हॅंगिंग चर्च आहे. पाण्यावर खांब बांधून त्यावर हे चर्च बांधले. तिथे त्यांनी एक फरशी काचेची केली आहे. त्यामुळे त्या फरशीतून खाली पाहिल्यावर आपण पाण्यावर उभे आहोत असेच वाटते.
कायरोमध्ये इजिप्तचे राष्ट्रीय संग्रहालय आहे. माझ्या “मम” बद्दलच्या पत्रात मी या संग्रहालयाचा उल्लेख केला होता. तुला आठवते का? इथे ममीजसाठी वेगळा कक्ष आहे ज्यामध्ये फेरोंच्या आणि त्यांच्या राजांच्या ममीज ठेवलेल्या आहेत. तेच हे संग्रहालय. इथे प्राचीन इजिप्तचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुर्दैवाने इजिप्तमधील कित्येक मौल्यवान वस्तू आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचल्या असल्यामुळे बऱ्याच वस्तू इथे नाहीत.
तसेच हे संग्रहालय प्रचंड मोठे आहे आणि त्यामानाने तिथे व्यवस्थित पाट्या नाहीत. त्यामुळे गाईडशिवाय तिथे गेले तर आपल्याला हरवल्यासारखे होते.
खान-ए-खलीली मार्केट हे खास पर्यटकांसाठी असलेले मार्केट. इथे मुख्यतः भेटवस्तू मिळतात. कीचन, फ्रिजमॅग्नेट, शोपीस, पत्ते, पिशव्या प्रत्येक वस्तूवर इजिप्तची काहीतरी खूण आहे – पिरॅमिड्स, फेरो, लाईफ आफ्टर डेथचे चिन्ह. हे मार्केट एक चक्कर मारून संपणाऱ्यातले नाही. ते बरेच मोठे आहे. इथे जाण्यात खरी मजा सूर्यास्तानंतर येते. दिव्यांच्या रोषणाईत हे मार्केट उजळून निघते तेव्हा आपले डोळे दिपतात.परंतु इथे काहीही खरेदी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे – कोणत्याही वस्तूची किंमत किमान अर्ध्यापेक्षा कमी करून मागायची.
मला पुन्हा एकदा वेडेपिसे केले ते नाईलने. नाईल कायरोच्या मधून वाहते. लक्सोरमध्ये छोट्या गावातली नाईल बघायला मिळते. तिची खरी शोभा दिवसा. राजधानीची सर तिला कशी येणार? राजधानीत प्रवेश केल्यावर नाईल जास्तच दिमाखात वाहते. चहूकडच्या लाईट्सनी त्याचे पाणी विविध रंगांनी उजळून निघते. सूर्यास्तानंतर तिच्या किनारी वेळ घालवणे हे खूप सुखकारक आहे आणि त्याचा मी सध्या मनमुराद आस्वाद घेते आहे.
तुझी,
प्रवासी मावशी