पत्रसंवाद: सैन्याला विसरू नका !!!

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रमोद बापट

10 मार्चला निर्वाचन अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि तत्क्षणीच आचारसंहिता लागू झाली. वाहतूक, सिग्नल, पदपथ, प्लॅस्टिक, थुंकणे, कचरा विल्हेवाट अशा दैनंदिन शिस्तीच्या गोष्टींकडे कायम दुर्लक्ष किंवा दुय्यम लेखणारे नागरिक आणि पक्ष; या आचारसंहितेबद्दल अगदी भिंग लावून लक्ष ठेवून असतात. आणि कोण कुठे सापडतोय यावर ध्यान देतात. दुसरीकडे तिकीट देईल ती आपली पार्टी अशा पक्षनिष्ठेने धावाधाव करणारे इच्छुक पळा ऽऽ पळाचा खेळ सुरू करतात.

अर्थात याच वेळी सर्वच उमेदवार आपल्या स्थावर-जंगम मालमत्ता, आयकर , जात-पडताळा प्रमाणपत्र अशा आवश्‍यक त्या दाखल्यांची जुळवाजुळव करू लागतात. अचानक लक्षात येते की आपल्या एकूण आर्थिक ताकदीत गेल्या 5 वर्षात बरीच वाढ झाली आहे आणि काही गोष्टींचा हिशेबात उल्लेख राहून गेला आहे की काय अशी धाकधूकही वाटू लागते. पण मनातली खासदारकीची इच्छा तीव्र असल्याने त्यापुढे थोडंफार दुर्लक्ष करण्याचा धोकाही पत्करायची तयारी असते. आणि मग लक्षात येते की भाषणाची तयारी कधी व कशी करायची? आधीचा पक्ष, तिकीट देणारा पक्ष, नेमके कोणते विषय आणि मुद्दे मांडायचे ? आणि या महत्त्वाकांक्षी सोहळ्यासाठी किती रकमेची तरतूद करायची याचा विचार सुरू होतो.
शेवटी सर्व निर्णय होऊन उमेदवारीचा अर्ज भरण्याची क्रिया पूर्ण होते, आणि मालमत्तेचा आकडा सर्व माध्यमात जाहीर होतो.

मागील निवडणुकातील आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येते की काही अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व उमेदवार लक्षाधीश/कोट्यधीश आहेत आणि यातील साधारण 540 नशीबवानांचे बाबतीत पुढच्या 5 वर्षात हे आकडे कित्येक पटीने वाढलेले दिसू शकतात.

तेव्हा केवळ जनतेच्या सेवेसाठी लाख/कोटींचा हा खेळ खेळणाऱ्या मंडळींकडून; सैन्याप्रति कृतज्ञता म्हणून, अर्जात जाहीर केलेल्या मालमत्ता स्रोतांवर टप्प्याटप्प्यानुसार विशिष्ट रक्कम देणगी म्हणून घ्यावी, आणि ती रक्कम सैन्य फंडात जमा करावी. मालमत्ता आणि त्यानुसार सैन्य-फंडाची टक्केवारी ही राजकीय पक्ष एकत्रितरित्या आणि लवकर जाहीर करतील अशी अपेक्षा, नाहीतर सर्वच उमेदवारांनी जाहीर मालमत्तेच्या 10% रक्कम सैन्य फंडाला स्वेच्छेने द्यावी अशी अपेक्षा ठेवणे योग्य राहील ना?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)