एमआयडीसीला प्रगतीचा चेहरा देऊ- डॉ. विखे

नगर  – नगर औद्योगिक वसाहतीचा विकास हा सुसंवादातून व सुरक्षेची भावना निर्माण करुन करावा लागणार आहे. येथील उद्योजक व कामगारांशी मित्रत्वाचे नाते जोडून भविष्यात या उद्योगनगरीला प्रगतीचा चेहरा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. विखे पाटील यांनी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांशी संवाद साधला. औद्योगिक वसाहतीबरोबरच उद्योजकांचे प्रश्‍न त्यांनी जाणून घेतले. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रश्‍नांबाबत त्यांनी उद्योजकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून निवडणुकीतील आपली भूमिका दिलखुलासपणे मांडली. याप्रसंगी भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकर, अनंत देसाई, विश्‍वनाथ पोंदे, आमी संघटनेचे अशोक सोनवणे, अभिजित लुणीया, महेश इंदाणी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, नगरची औद्योगिक वसाहत ही ज्या पध्दतीने विकसित व्हायला हवी, तशी झाली नाही. कारण हा विकास साध्य करण्यासाठी तशा नेतृत्वाची आवश्‍यकता होती. उद्योजकांचे प्रश्‍न समजून घेणे आणि हे प्रश्‍न प्रशासकीय स्तरावर तेवढ्याच आत्मीयतेने माडण्याची गरज होती. पण तशी प्रक्रिया न झाल्यानेच या औद्योगिक वसाहतीतील प्रगतीचे आडथळे दूर होऊ शकले नाहीत.

औद्योगिक वसाहतीतील कामगारांना येण्यासाठी शहर बससेवेची मोठी गरज आहे. हा प्रश्‍न यापूर्वीच सोडविला गेला असता, तर कामगारांना येण्यासाठी सोय झाली असती. शहर बस वाहतूक सेवा ही औद्योगिक वसाहतीपर्यंत सुरू करण्याचे माझे पहिले ध्येय आहे. औद्योगिक वसाहतीबाबतीत असुरक्षिततेची भावना का निर्माण आहे, हे मला समजत नाही. पण हे वातावरण आपल्याला बदलावे लागेल. उद्योग, कामगार आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील मित्रत्वाचे नातेच विकासाला गती देईल, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच रोजगारासाठी या शहरातून होणारे तरुणांचे स्थलांतर थांबवायचे असेल, तर मोठे उद्योग आणण्याची गरज आहे.उद्याच्या आपल्या पिढीचे, शहराचे आणि या उद्योग नगरीचे भवितव्य घडविण्यासाठी सर्वांनी विचार करावा, असे ते म्हणाले.पेशकर यांनी केंद्र सरकारने उद्योजकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)