कॉंग्रेसच्या स्टार नेत्यांची प्रचाराकडे पाठ

नगर – नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रचारासाठी वानवा भासत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वत:च्या मतदारसंघात अडकून पडले आहेत आणि जनमाणसांवर प्रभाव पाडेल, असा उत्तम वक्ता कॉंग्रेसकडे नसल्याने राज्यात सगळीकडेच ही समस्या भासत आहे. नगर दक्षिणेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत असतांना शिर्डी मात्र कॉंग्रेसचा एकही नेता फिरकला नाही. त्यामुळे येथील कॉंग्रेसच्या उमेदवाराची भिस्त स्थानिक नेत्यांवर आहे.

दरम्यान, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचार सभा शिर्डी लोकसभा मतदारसंघात होणार आहे की नाही. याबाबत आता कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अर्थात या मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवाराची जबाबदारी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे हे ठरतील त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. त्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे कॉंग्रेसमध्ये आहे पण अन्‌ नाही पण त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत.

नगर जिल्ह्यात लोकसभेच्या नगर व शिर्डी हे दोन मतदार संघ असून शिर्डीत कॉंग्रेसचा उमेदवार आहे. या मतदारसंघात आ. थोरात यांच्याच काय त्या सभा झाल्या आहेत. अजूनही राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील नेता आलेला नाही. या घडीला लोकांवर प्रभाव टाकेल व ज्यांची भाषणे ऐकायला लोक जमतील असा एकही नेता प्रदेश कॉंग्रेसकडे नाही. ना. विखे मुलाच्या प्रचारात गुंग आहेत.

कॉंग्रेस विदर्भात जास्त जागा लढवत आहे व तिथे काही जागांवर त्या पक्षाची स्थिती चांगली असल्याने त्या जागांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थात सभा घेण्यासाठी मोठा निधी लागतो. त्यात गर्दीचे टेन्शन असते. त्यात पक्षनिधी कमी आल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी किंवा सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा किंवा एखादा रोड शो तरी व्हावा, अशी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे; परंतु त्याबद्दल राज्यस्तरावरूनही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. अर्थात राष्ट्रीय व राज्यपातळीवर नेते सध्या तरी नगरमध्ये येण्यास धजावत नसल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात आल्यानंतर ना. विखेंना लक्ष्य करावे लागले. त्यांच्याबद्दल प्रचार सभेत बोलावे लागणार आहे. ते टाळण्यासाठी हे नेते मंडळी शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात फिरकत नसल्याचे बोलले जात आहे. याबाबत आता कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)