लोकसभेच्या निकालावरच आगामी निवडणुकांची गणिते; भाजप इच्छुकांच्या आतापासूनच जोर बैठका
बालेकिल्ल्याचे काही दगड हलवण्यात भाजपला यश सुद्धा आले आहे. कराड, मश्वर, सातारा, खंडाळा, मलकापूर या ठिकाणी भाजपचे प्राबल्य वाढले असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील राजकारणाचा रिमोट आपल्या हाती ठेवला आहे. वाईत मदन भोसले सारखा पत्ता हाताला लागल्याने वाई मतदारसंघात मकरंद आबांसाठी आगामी निवडणूक टफ फाईट असणार आहे. कराड दक्षिणमध्ये उंडाळकर गटाने राष्ट्रवादीच्या विरोधात काम करून पुन्हा धोक्याची घंटा वाजवली. कोरेगावात महेश शिंदे यांनी आमदार शिंदेच्या विरोधात वातावरण तापवल्याने तुल्यबळ लढतीचे राजकीय ढग आतापासूनच जमा होऊ लागले आहेत.
सातारा – राष्ट्रवादीचा चिरेबंदी वाडा भेदण्याचे मार्ग सातारा व माढा लोकसभा मतदार संघातून शोधायचे याची पक्की रणनिती आखत भाजपने लोकसभेचे अंदाज ठरवले आहेत. विधानसभाही एनकॅश करण्याची तयारी भाजपने चालवल्याने राष्ट्रवादीसाठी विधानसभेचा पेपर अवघड असणार आहे.
उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीच्या आमदारांमधील अंर्तगत वाद शरद पवारांनी पेल्यातील वादळे ठरवत सातारा व माढा मतदारसंघात राष्ट्रवादी एकसंघपणे उभी केली. माढ्यात विजय सिंह मोहिते सारखे बिनीचे शिलेदार भाजपवासी झाल्याने पवारांनी संजय मामा शिंदे यांना उमेदवारी देऊन अंर्तगत विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे भोसले यांनी सर्व आमदारांना ताकत देण्याची जी राजकीय प्रतिज्ञा केली होती तो आमदारांना खूश करण्याच्या तंत्राचा भाग होता त्यामुळेच सातारा जिल्हयात लोकसभा निवडणुकांच्या बरोबरीने विधानसभा निवडणुकांचे संदर्भ येऊ लागले आहेत.
उदयनराजेंसाठी ज्या ज्या आमदारांनी रात्रीचा दिवस केला त्यामागे निश्चित “पॉवर नीती ‘होती. मात्र उदयनराजे यांचे उपद्रवमूल्य आणि विधानसभेसाठी मोर्चेबांधणीची त्यांनी केलेली घोषणा याचा रागरंग बघून सातारा व माढा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीला कोंडीत पकडणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांचा पुरेपूर वापर करून घेतला. लोकसभेत नरेंद्र पाटलांच्या धनुष्य बाणातून तीर मारताना कराड उत्तर कराड दक्षिण, वाई, खंडाळा, मश्वर व माण, कोरेगाव या मतदारसंघात भाजपने संबधित उमेदवारांचा पुरेपूर होमवर्क करून घेतला.
साताऱ्यात मात्र भाजपचा बेस तयार होऊनही पक्की तयारी दिसली नाही. नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची मिसळ डिप्लोमसी आणि त्यांचे गर्भित राजकीय सख्य चांगलेच लक्षात राहिले. अलीकडेच भाजपमध्ये आलेले वाईचे माजी आमदार मदन भोसले कराड दक्षिण मधून अतुल भोसले कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, कोरेगावमधून महेश शिंदे, साताऱ्यातून दीपक बापू पवार या सारख्या चेहऱ्यांना राजकीय ताकत देत भाजपने राष्ट्रवादीला तगडी टक्कर देण्याची तयारी चालवली आहे.
विधानसभेत हेच चेहरे राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक असणार आहेत. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील किती मताधिक्क्य देणार याची सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे. साताऱ्यात थोरले बंधू उदयनराजे यांच्यासाठी स्वतः शिवेंद्रराजे रस्त्यावर प्रचारासाठी उतरले मात्र त्यांची नगरविकास आघाडी साताऱ्यात औषधाला पण दिसली नाही. हा राजकीय सस्पेन्स आहे यामध्ये मनोमिलनाचे संदर्भ कमी तर पवार आज्ञेचा जास्त प्रभाव होता.
पाटणमध्ये सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी धनुष्यबाणाचे प्रामाणिक काम केले. सत्यजित पाटणकर उदयनराजे यांना किती मताधिक्य देणार या सगळ्याच प्रश्नांवर सध्या 23 मे इतकेच उत्तर आहे. मात्र लोकसभेचा निकाल हाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी दिशादर्शक असणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर साताऱ्याचा अपवाद वगळता राष्ट्रवादीला प्रत्येक जागेसाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. म्हणूनच लोकसभेचा धुरळा येत्या दहा दिवसात खाली बसेल मात्र विधानसभेचा पेपर राष्ट्रवादीसाठी नक्कीच अवघड असणार आहे.