पुणे -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुणे शहरातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या शनिवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघातील पक्षनिहाय मतांच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
लोकसभेवळी पुण्यातील जागा कॉंग्रेसने लढविली असली, तरी राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या भागातील मतदानाची टक्केवारी तसेच शहरातील कॉंग्रेसच्या स्थितीचाही अंदाज घेतला जाणार आहे. दोन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुका आघाडीतच लढण्याचे सांगण्यात येत आहे. शहरात विधानसभेच्या आठ जागा आहेत. त्यामुळे आघाडीनंतर शहरातील मतदारसंघाच्या वाटपाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी ही आढावा बैठक महत्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच ही प्राथमिक बैठक असल्याचेही सांगण्यात आले.