“एलईडी’ प्रकल्प बिलावरून “नमते पाऊल’ 

पैसे देणार : देखभाल दुरूस्तीस कंपनीचा नकार 

पुणे – शहरात वीज बचतीसाठी एलईडी फिटींग्ज बसविण्याचे काम दिलेल्या टाटा प्रोजेक्‍टस कंपनीचे बिल महापालिकेने नगरसेवकांच्या तक्रारीनंतर थांबविले होते. तसेच या कंपनीशी झालेल्या कराराचे आणि त्यांनी केलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिटही सुरू केले होते. मात्र, यामुळे कंपनीने शहरात बसविलेल्या एलईडी दिव्यांची देखभाल दुरूस्तीची कामेच बंद केल्याने अडचणीत सापडलेल्या पालिका प्रशासनाने या कंपनीचे थांबलेले बिल पुन्हा देण्याचा निर्णय बुधवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे झालेल्या बैठकीत घेतला.

या योजनेच्या करारात अपूर्ण असलेल्या बाबी, तसेच करार करताना झालेल्या चुकाही पुन्हा दुरूस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. टाटा कंपनीने आतापर्यंत शहरात सुमारे 75 हजार एलईडी फिटिंग्ज बसविले असून आणखी 25 हजार फिटींग्ज बसविण्याचे काम कंपनीस देण्यात आले आहे. तसेच यातून होणाऱ्या वीज बचतीतून काही हिस्सा महापालिकेस तर काही कंपनीस दिला जाणार आहे. मात्र, या कंपनीचे काम चांगले नाही, तसेच करार चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी मुख्यसभेत केल्या. त्याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. ते सुरू असतानाच, या कंपनीने महापालिकेविरोधात दंड थोपटत या प्रकल्पाची देखभाल-दुरूस्ती बंद करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पालिकेने एक पाऊल मागे घेत या कंपनीची थकीत बिले तातडीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)