शहर स्वच्छतेसाठी व्याख्यानमाला

पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभागाला प्राधान्य
महापालिकेचा पुढाकार : दरवर्षी करणार आयोजन 

पुणे  – शहरातील घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविणासाठी महापालिकेकडून यंदाच्या वर्षीपासून शहरातील नागरिकांसाठी घनकचरा व्यवस्थापन व्याख्यानमाला घेतली जाणार आहे. अशा प्रकारची व्याख्यानमाला पहिल्यांदाच घेणारी पुणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. “स्वच्छ सर्वेक्षण-2020′ अंतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या स्तरावर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, नागरिकांचा सहभाग असल्याशिवाय, शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर 100 टक्‍के वर्गीकरण तसेच प्रक्रिया करणे शक्‍य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभागाला प्राधान्य देत आहे. त्या अंतर्गत यंदाच्या पर्यावरण दिनापासून महापालिकेकडून शहरात कचऱ्यासाठी व्याख्यानमाला घेण्यात येणार आहे. 5 ते 7 जून या कालावधीत सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ही व्याख्यानमाला घोले रस्ता येथील पालिकेच्या कलादालनात होणार आहे.

या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन महापौर मुक्‍ता टिळक यांच्या हस्ते होणार असून पहिल्या दिवशी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांचे “माझ्या परिसराची स्वच्छता’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी “शिवरायांचे पर्यावरण धोरण व घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर डॉ. अजित आपटे यांचे व्याख्यान होणार आहे. तर व्याख्यानमालेचा शेवट वास्तुविशारद प्रसन्ना देसाई यांच्या “शहरातील चौकांचे सुशोभीकरण’ या विषयाने होणार असून आयुक्‍त सौरभ राव यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मोळक यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)