युतीचा विषय माझ्यावर सोडा : उद्धव ठाकरे

खासदारांना आदेश: भाजपकडून कुठलाही संपर्क साधण्यात आला नसल्याचे संकेत

मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असूनही राज्यात आणि केंद्रात एकत्रितपणे सत्तेवर असणाऱ्या भाजप आणि शिवसेना या दुरावलेल्या मित्रपक्षांमध्ये युती होण्याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, युतीचा विषय माझ्यावर सोडा. तुम्ही तुमच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करा. शेतकऱ्यांचे प्रश्‍न आक्रमकपणे मांडा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्धव यांनी सोमवारी त्यांच्या येथील मातोश्री निवासस्थानी शिवसेना खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत उद्धव यांनी दिलेल्या आदेशाची माहिती त्यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान यांनी मंगळवारी दिली. शिवसेना आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल. खासदारांना पुन्हा निवडून येण्याचा विश्‍वास वाटत नसेल तर त्यांनी इतरांसाठी मार्ग मोकळा करावा, असे उद्धव यांनी बैठकीत म्हटले. शिवसेना राज्यातील जनतेशी वचनबद्ध असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव यांनी मागील वर्षी जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेना जुना मित्रपक्ष भाजपशी युती करणार का, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

दोन्ही पक्षांमध्ये मागील दाराने चर्चा सुरू असल्याचे वृत्त काही वाहिन्यांकडून दिले जात आहे. मात्र, शिवसेनेने अजूनही युतीबाबत अजूनही जाहीरपणे अनुकूलता दाखवलेली नाही. मागील वर्षी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतली. त्यावेळी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शहा यांच्या भेटीनंतर भाजपकडून कुठलाही संपर्क साधण्यात आला नसल्याचे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)