#चर्चेतील चेहरे: जाणून घ्या ! ‘सीमा नंदा’ यांच्याविषयी  

अमेरिकेतील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाच्या सीमा नंदा यांची या आठवड्यात निवड झाली. या दोन प्रमुख पक्षांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या नागरिक ठरल्या आहेत.
व्यवसायाने वकिल आणि मॅसाच्युसेट बार असोसिएशनच्या सदस्या असलेल्या सीमा नंदा यांच्या राजकीय कारकिर्दीपुढे पुरुषांचे वर्चस्व हेच मुख्य आव्हान आहे. कितीही प्रगत म्हटले तरी महिलांना दुय्यम वागणूक मिळण्याचा त्रास सीमा नंदा यांनाही सोसावा लागला. त्यातही भारतीय वंशाच्या असल्याने त्यांना हा त्रास जरा जास्तच सहन करावा लागला. यापूर्वी बराक ओबामा यांच्या कारकिर्दीदरम्यान श्रम मंत्रालयात सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम केले होते. सध्याचा काळ केवळ आपल्या करिअरसाठीच नव्हे, तर अमेरिका आणि आपल्या पक्षाच्या भविष्यासाठीही सर्वात आव्हानात्मक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनच आपल्या देशाला वाचवण्यासाठी कार्यरत रहायला हवे, हे निश्‍चित झाले होते. यावरच अधिक जोरकसपणे भर देत नंदा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यक्रम आखायला सुरुवात केली. या वर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या निवडणूकांमध्ये डेमोक्रॅट उमेदवारांना निवडून आणण्यासाठी अनेक विषय त्यांनी लावून धरले आहेत. त्यात आरोग्यसेवा हा प्रमुख मुद्दा आहे. डेमोक्रॅट पक्षाकडे इमिग्रेशन आणि जॉब हमीबाबत जागरुकता निर्माण करण्याचीही मोठी जबाबदारी आहे.
भविष्यकालीन योजनांसाठी आपल्या पक्षाची धोरणे अधिक सुस्पष्ट करण्याकडेच सीमा नंदा यांचा अधिक कल आहे. अमेरिकेच्या राजकारणामध्ये विशेष सक्रिय असलेल्या सिनेटर कमला हॅरिस आणि कॉंग्रेस वुमन प्रमिला जयपाल यांच्या मदतीने अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये रोजगार, राजकारण आणि सामाजिक सेवांबाबतची जनजागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. नॅशनल कमिटीकडून मुख्य कार्यकारी पदाची सूत्रे घेतलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन महिला म्हणून तर त्यांचा अभिमान भारताला वाटायला हवाच. त्याशिवाय आपल्या पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर त्या अमेरिकेतील महिलांपुढील “रोल मॉडेल’ बनत आहेत.याचाही सार्थ अभिमान वाटायला हवा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)