जाणून घ्या ! कशी कराल दम्यावर मात ?

डॉ. राजेंद्र माने

भारतातील सहा मुलांपैकी एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. सीआरएफ या संस्थेने 2003 साली लहान मुलांच्या आरोग्याची पाहणी केली. या पाहणीत असं दिसून आलं की, त्या सालात लहान मुलांमध्ये दम्याचं 2.5 टक्के एवढं प्रमाण होतं. 2008मधील पाहणीत मात्र हे प्रमाण 5. 5 टक्के झालं होतं. तर 2012 मध्ये या प्रमाणात साधारण आठ टक्क्‌यांपेक्षा अधिक वाढ झाली होती. त्यामुळेच दमा या आजाराविषयी माहिती करून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
प्रदूषित वातावरणामुळे फुप्फुसांचे आरोग्य बिघडण्याचा मोठा धोका देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फुप्फुसांच्या आजारांमधील दमा हा एक दीर्घकाळ चालणारा आजार. या आजाराविषयीची जागरूकता निर्माण होण्यासाठी हा लेखप्रपंच, खास आजच्या जागतिक अस्थमा जागरूकता दिनाच्याफ निमित्ताने..दमा या आजाराची मुख्य लक्षणं म्हणजे सतत खोकला येणं, धाप लागणं.. याशिवाय श्‍वासोच्छ्वास करताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणं, श्‍वास बाहेर सोडण्यास त्रास होणं. छातीवर वजन पडल्यासारखं वाटणं.. ही सगळी दम्याची लक्षणं आहेत.
पोटामध्ये इन्फेक्‍शन झाल्यानेदेखील दमा होण्याची अधिक शक्‍यता असते. दमा ही श्‍वासाशी निगडित व्याधी जडण्याचं प्रमुख कारण आहे, वाढतं शहरीकरण. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्‍याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही. लहान मुलांचा घरामधील(अतिसूक्ष्म धूलीकण तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदूषणांशी येणारा संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसंच अंडी, शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थाची लहान मुलांना होणारी ऍलर्जी यातूनही दमा होण्याची शक्‍यता असते. आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थाची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्न पदार्थाने दम्याचा त्रास होतो, हे ओळखता येईल. मुलांना होणा-या ऍलर्जिक दम्याचे परिणाम पडताळले नसल्यास ते त्वरित पडताळणे आवश्‍यक आहेत.
लहान वयात दमा होण्याचं प्रमाण जास्त असतं. याला आपली बदलती खाद्य संस्कृती, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, कम्प्युटर अशा अनेक गोष्टी जबाबदार आहेत. यासाठी पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. मुलांकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार वाढू शकतो. त्यामुळे पालकांना मुलांमध्ये दम्याची लक्षणं दिसताच त्यांनी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
अस्थमा असल्यास ही काळजी घ्या 
 • मुलाला दम्याचा अटॅक आल्यास सरळ बसू द्या. लगेच झोपवू नका. शांत आणि ढिलेपणाने पडायला सांगा. कपडे सैल करा.
 • डॉक्‍टरांनी सांगितलेली रिलीव्हर औषधे लगेचच द्या. त्यामुळेही सुधारणा नसेल तर आणखी पाच मिनिटांनी रिलीव्हर औषधं थोडया प्रमाणात द्या.
 • तरीही बरं वाटत नसेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.
 • याशिवाय मुलाला स्वत:ला अस्थमाविषयी औषधं आणि साधनं (इनहेलर्स, स्पेन्सर्स) कशी वापरावीत, ते शिकवा.

इतर काळजी 

 • आठवडयातून एकदा अंथरूण पांघरूण गरम पाण्याने धुवा व खडखडीत सुकवा. डस्ट फ्री कव्‌र्हस वापरणं चांगलं.
 • मुलांची खेळणी नीट धुऊन स्वच्छ करता येतील अशीच वापरा.
 • मांजर, कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांचा सांभाळ जपून करावा.
 • तुमच्या मुलाच्या कीटमध्ये नेहमीच एक रिलीव्हर हॅंडी पॅक ठेवा.
 • शाळेमध्ये तात्काळ वेळेसाठी सूचना तुमच्या टेलिफोन नंबरसहित लिहून द्या.
 • अन्न हवारोधक डब्यांमध्ये ठेवा.
 • दमट जागा जसे की, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह किंवा तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एक्‍झॉस्ट पंखे लावा. तिथे येणारी शेवाळ नीट धुवून ती जागा पूर्णपणे सुकवा व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करा, जेणेकरून परत बुरशी येणार नाही.
 • धुम्रपान टाळा. विशेषत: मुलांसमोर व घरात तर कटाक्षाने टाळाच. कारण त्याचा धूर बराच वेळ घरात रेंगाळत राहतो.
 • एखाद्या उत्पादनातील केमिकलची मुलाला ऍलर्जी आहे, असं लक्षात आलं तर ती वस्तू टाळा.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)