जाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी

अनुवंशिकता, मधुमेह आणि स्टिरॉइड औषधांचा वाढता वापर यामुळे गाउकोमा (काचबिंदू) या आजाराचं प्रमाण वाढत आहे. या आजारात एकदा गेलेली दृष्टी पुन्हा येत नाही. मात्र वेळीच तपासणी आणि योग्य उपचार करून शिल्लक राहिलेल्या दृष्टीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात.

काचबिंदू का होतो, तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. या आजारात डोळ्यांतील प्रेशर वाढतं. यामध्ये मुख्यत: डोळ्यांतील आंतर दाब वाढतो आणि त्याचे परिणाम डोळ्यांतील विविध भागांवर दिसू लागतात. हा दाब वाढण्याचं मुख्य कारण डोळ्यांच्या आतील द्रवाच्या अभिसरणामध्ये अडथळा येणे हे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामान्यत: डोळ्यांतील दाब हा 10 ते 20 मीमी ऑफ मॅक्‍युरी इतका असतो. काचिबदू झालेल्या डोळयात तो 22च्या वर आणि 40 ते 60 पर्यंतही जाऊ शकतो. दृष्टीची संवेदना मेंदूकडे नेणारी मज्जा म्हणजे ऑप्टीकनव्‌र्ह अशा दाबामुळे सुकत जाते. यावर वेळेवर उपचार होऊ न शकल्यास अंधत्व येतं.

खरं तर काचबिंदू कोणालाही होऊ शकतो. मात्र तो होण्यातही आनुवंशिकतेचा मुद्दा आहेच. एखाद्याच्या कुटुंबात आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा भावाबहिणीला काचबिंदू असल्यास त्यालाही काचबिंदू होण्याची शक्‍यता 2 ते 4 पटीने जास्त असते. म्हणूनच त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. ठरावीक कालावधीनंतर डोळ्यांच्या आवश्‍यक त्या चाचण्या करून घेण्याची गरज असते आणि ज्यांच्याकडे काचबिंदू होण्याची आनुवंशिकता नाही, अशांना काचबिंदू होण्याची शक्‍यता 5 ते 10 टक्के इतकी असते.

काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षात आलं नाही तर त्यामुळे येणारं अंधत्व स्वीकारण्यावाचून आपल्याला पर्याय राहात नाही. हा काचबिंदूतला सर्वात मोठा धोका आहे. तसंच हाच तर काचबिंदू आणि मोतीबिंदू यातला मूलभूत फरक आहे. मोतीबिंदूवर उपचार केल्यानंतर, त्यासाठीचं ऑपरेशन केल्यानंतर आपली दृष्टी जवळजवळ 100 टक्के पूर्ववत होते. पण काचबिंदूमध्ये 5 टक्के जरी दृष्टी कमी झाली तरी त्यावर काही उपाय करता येत नाही.

90 टक्के रुग्णांना काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षातच येत नाही, आणि हे असे रुग्ण निम्न आर्थिक स्तरातले किंवा अल्पशिक्षितच असतात असं नाही; तर अगदी उच्चशिक्षित-अगदी डॉक्‍टर्सनाही आपल्याला काचबिंदू झाल्याचं लक्षात येत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा बहुतेक वेळा उशीर झालेला असतो. रक्ताच्या प्रवाहाचे जे आजार असतात म्हणजे मधुमेह (डायबेटिस), रक्तदाब (ब्लडप्रेशर) यांसारखे आजार असणा-यांनी डोळ्यांची तपासणी वेळेवर करावी.

कधीकधी प्रेशर नॉर्मल असतं; पण डोळ्यांची आतली नस तपासली असता काचबिंदूची चिन्हं दिसतात. त्यावरून संभाव्य काचबिंदू लक्षात येऊ शकतो. या चाचण्यांमधून अगदी तिशी-चाळिशीच्या उंबरठयावर असलेल्या रुग्णांनाही काचबिंदू होण्याची शक्‍यता असेल तर वेळेत निदान करता येतं. आणि पुढचा धोका टाळता येतो. आज आपल्याकडे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण लोकांमध्ये जागृती झालेली नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.

फक्त काचबिंदूसाठी नाही तर डोळ्यांची तपासणी प्रत्येक दोन वर्षानी करावी. एकदा काचबिंदूचा आजार होऊन डोळे वाचलेल्यांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांचे प्रेशर तपासावं. स्वत:च्या मनाने कुठलंच स्टिरॉइड गटात मोडणारं औषध डोळ्यांसाठी वापरू नये. त्यानेही काचबिंदूचा धोका वाढतो. यावर उपाय एकच, काही वर्षाच्या अंतराने डोळ्यांची तपासणी करा. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याशिवाय कुठलेही ड्रॉप्स डोळ्यांत घालू नका.

सखोल नेत्रतपासणी करा
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 2.6 टक्के लोकांना काचबिंदू होतो. नियमित आणि सखोल नेत्रतपासणीमुळे या डोळ्यांच्या आजाराचं निदान लवकरात लवकर होतं. भारतात काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराला बळी पडणा-या स्त्रियांची संख्या जास्त आहे. विशेषत: अँगल क्‍लोझर ग्लुकोमा ज्यात बुब्बुळ डोळ्यांतील द्रवपदार्थाचं (ऍक्वेयस ह्युमर) वहन होण्यापासूर रोखतं. हा आजार स्त्रियांमध्ये जास्त होतो.

आयओपी उपचारपद्धती                                                                                              काचबिंदूवर कुठलेही उपचार नसले तरीही सध्याच्या परिस्थितीत एलिव्हेटेड इन्ट्रा ऑक्‍युलर प्रेशर (आयओपी) हा एकच उपचार योग्य आहे. सर्वात प्रभावशाली औषधांनी उपचार करणं आवश्‍यक असते. त्यात डोळ्यांच्या ड्रॉप्सद्वारे दीर्घकालीन नियंत्रणासाठी एलिव्हिटेड आयओपी कमी करता येऊ शकतो. काही वेळ शस्त्रक्रियाही उपयुक्त ठरू शकते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्लिट लॅम्प तपासणी, ऑप्टिक डिस्क मूल्यमापन याही डोळ्यांच्या तपासण्या कराव्या लागतात.
अशा प्रकारे काळजी घेतल्यास डोळ्यांचा त्रास कधीच होत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)