नेत्यांचं “ठरलयं’, जनताही “ठरवणार’

प्रशांत जाधव
राजकारणासाठी आले तसे पाणीप्रश्‍नासाठी सर्वपक्षीय एकत्र आले का?
माण- खटावच्या जनतेचा संतप्त सवाल

सातारा – विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच अचानक माण मतदारसंघात नेत्यांच्या एकीच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. आमदार जयकुमार गोरेंना हटवण्यासाठी मोर्चे बांधणीला वेग आला. “”आमचं ठरलयं” असे म्हणत सर्वपक्षीय नेते जोर बैठका काढू लागलेत. मात्र, दुसऱ्या बाजूला याच सर्वपक्षीय नेत्यांच्या एकीवर जनतेतून प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहे. विधानसभेच्या तोंडावर आमचं ठरलयं म्हणणारे हे नेते पाणीप्रश्‍नावर कधी एकत्र आले का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

पूर्वीचा खटाव अन्‌ सध्याचा माण या मतदारसंघातील जनता आजअखेर पाण्यासाठी संघर्ष करत आहे. दुष्काळाच्या झळांनी या दोन्ही तालुक्‍यातील जनता बेहाल झाली. लोकांनी स्थलांतरे केली. त्यावेळी याच दोन्ही तालुक्‍यांतील एकाही नेत्याने त्यावर आवाज उठवला नाही की आज जसा एकीचा नारा दिला तसा देण्याचा त्रास घेतला नाही. यावरून आज होत असलेली एकी जनतेच्या भल्यासाठी होत आहे, यावर कोणत्या न्यायाने विश्‍वास ठेवायचा. खरचं कालपरवा झालेली एकी दुष्काळाविरोधात, हक्काचे पाणी दुसरीकडे जात असताना झाली असती तर आज मतदारसंघाचे रुपडे वेगळे असते. एकी कोणाविरोधात केली यापेक्षा ती का केली अन्‌ जनतेला गरज असताना का नाही केली, या प्रश्‍नांची उत्तरे भविष्यात नेते मंडळींना द्यावीच लागतील.

सत्तेचे लोणी खाण्यासाठी मतभेद विसरून बोके कसे एकत्र येतात, याचा प्रत्यय सध्या माण तालुक्‍यात पदोपदी येत आहे. मग, ती ग्रामपंचायत असो वा जिल्हा परिषद. बाहेर एकमेकांच्या तंगड्या कसे खेचतो, आमचे वैचारिक मतभेद कसे आहेत, हे दाखवायचे अन्‌ आत सत्तेचा मलिदा खाण्यासाठी उघडउघड हातमिळवणी करायची, असेच राजकारण सध्या माण मतदारसंघात सुरू असल्याचे दिसत आहे.

माण मतदारसंघातील जनतेला पाणी देतो म्हणून सांगायचे, सत्तेवर बसायचे, त्यानंतर चार वर्षे मुकाट राहयचे अन्‌ निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्षांकडून होणारे राजकारण, आंदोलने, मोर्चे, उपोषणे ही केवळ दिखाऊ असून सत्तेच्या लोण्याचा वाटा अधिकाधिक कसा मिळेल, तो गटागटा कसा खाता येईल, यासाठीच हा सर्व खटाटोप असल्याचे चाणाक्ष जनतेने हेरले आहे. यामुळे सर्वच नेते मंडळीच्या राजकीय वर्तनावर आता शंका येऊ लागल्या आहेत. काल परवा झालेल्या एकीचा उद्देश जनतेच्या समस्या सोडवणे, हा नसून आपले इच्छित ईप्सित साध्य करणे, हाच हेतू असल्याच्या संशयाचे धुके अधिक गडद होत चालले आहे. आ. गोरेंना विरोध करण्यासाठी आघाडी उघडलेल्या नेत्यापैकी एक असलेल्या भाजपचे अनिल देसाई यांनी 2009 च्या विधानसभेपासून ते माण बाजार समितीच्या निवडणुकीपर्यंत अनेकदा आ.

गोरेंना मदत केल्याचे बोलले जाते. एकेकाळी आ. गोरे व देसाई यांची “तात्या नको’ याच मुद्यावर एकी झाली होती. आज आ. गोरेंना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या नेत्यांचे दुखणं वेगळे आहे. लोकसभा निवडणुकीपासून आ. गोरेंचा भाजपाच्या श्रेष्ठींशी वाढलेला संपर्क माणचे भाजप नेते डॉ. दिलीप येळगांवकर, अनिल देसाई यांच्या पक्षीय अस्तित्वावर उठल्याचे चित्र आहे. तर निमसोडच्या देशमुखांना मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीचे तिकीट कापल्याचा राग आहे. प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे यांना तर पक्षाला नडले म्हणून धाकटे गोरे अन्‌ निरा देवधरच्या पाण्यावरून पवारांना अडचणीत आणले म्हणून थोरले गोरे यांना अडचणीत आणाच, असे थेट आदेश आहेत. त्यामुळेच बाकीच्यांचा शेखर गोरेंना विरोध नसतानाही केवळ राष्ट्रवादी सोबत यावी म्हणून शेखर गोरेंवर निशाना साधावा लागला.

आ. गोरेंची गुंडगिरी, दादागिरी असेलही पण ती नेमकी दहा वर्षांनी दिसावी यावरून आमच्या नेत्यांची दुरदृष्टी किती आहे याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. बाकी काही असो भविष्यात कोणी आमदार व्हावा हे जनता ठरवेलच पण यानिमित्ताने खटाव माणचे नेते एकत्र आले हे काही कमी नाही! आपण सारे भाऊभाऊ… हे खऱ्या अर्थकारणाचे सूत्र, राजकीय साधनशुचिता धाब्यावर बसवून नेते मंडळीनी जनतेचा विश्‍वासघात करू नये, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीचे दिवस किती?
जसे नव्याचे दिवस नऊ असे म्हटले जाते तसे माण मतदारसंघातील नेते मंडळींच्या एकीचे दिवस नक्की किती, अशी चर्चा सध्या सुरू आहे. कारण एकी नाट्यात सहभागी झालेल्या नेत्याचे ध्येय जरी गोरे असले तरी लक्ष्य विधानसभेची खुर्ची आहे. त्यामुळे आज एकत्र आलेले हे नेते उद्या खुर्चीसाठी कळवंडणार नाहीत कशावरून. तसेच विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र आलेले नेते दुष्काळावर एकत्र आले असते तर जनतेच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा नक्कीच हसऱ्या झाल्या असत्या.

बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न तरी नाही ना?
माण मतदारसंघात आ. गोरेंना थोपवण्यासाठी एकत्र आलेल्या नेते मंडळीपैकी सगळेच विधानसभेला उमेदवार नसतील. मग त्यावेळी यातीलच नाराज पूर्व इतिहासानुसार परत आ. गोरेंनाच मदत करणार नाहीत कशावरून, हे एकीकरणातील नेत्यांनाही माहीत आहे. मात्र, एकीच्या आडून स्वत:ची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी प्रयत्न झाले तर नवल वाटायलाच नको.

…. मग शेखर गोरेंना विरोध का?
माण-खटाव तालुक्‍यातील नेत्यांना जयकुमार गोरे नको आहेत. त्यांची दादागिरी वाढल्याचा त्यांचा आरोप आहे. मग हाच आरोप गेली सहा वर्षे शेखर गोरे करत आहेत. तरीही शेखर गोरेंनासुध्दा या सर्वपक्षीय नेत्यांकडून होत असलेला विरोध समजण्यापलीकडचा असल्याचे बोलले जात आहे.

येळगावकरांच्या हाकेला साद दिली असती तर…
डॉ. दिलीप येळगावकर आमदार असताना व त्याआगोदरही पाणी प्रश्‍नावर आक्रमक होते. जिल्ह्याचे पाणी सांगलीला पळवल्याचा त्यांचा आरोप होता. त्याविरोधात लढण्यासाठी त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या हाकेला कुणीच साद दिली नाही. त्यावेळी तसे केले असते तर आज ही वेळ आली असती का?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)