दलित चळवळीचा नेता हरपला

किशोरभाऊ तपासे यांचे आजारपणामुळे निधन

सातारा  दलित चळवळीचा नेता आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सच्चा पाईक तथा पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोरभाऊ तपासे यांचे पुण्यातील खाजगी रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून दलित जनतेचा खरा पॅंथर हरपल्याची भावना दलित जनतेतून होऊ लागली आहे.
किशोर तपासे हे नाव उभ्या महाराष्ट्राच्या परिचयाचे होते. लहानपनापासूनच किशोर भाऊ यांनी दलित जनतेच्या अन्यायाविरोधात लढ्याला सुरुवात केली होती.

सातारच्या पुरोगामी चळवळीचा चेहरा म्हणून भाऊंकडे पाहिले जात होते. विद्यार्थीदशेपासून दलित चळवळीत कार्यरत असलेले किशोर माधवराव तपासे हे दिवंगत कवी, साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या “दलित पॅंथर’ पासून ते दलित चळवळीशी जोडले गेले होते. सातारा जिल्ह्यातील दलित चळवळीचा चेहरा म्हणून ते ओळखले जात होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली तेंव्हापासून किशोर भाऊ आठवले साहिबांसोबत कार्यरत होते. किशोर भाऊ हे रामदास आठवले यांचे अगदी विश्‍वासू सहकारी होते. म्हणूनच त्यांची रिपाइंच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली होती. सातारा जिल्ह्यात रिपाइं हा पक्ष वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सातारच्या राजकारणातील कोणतेही निर्णय किशोर भाऊंना विश्‍वासात घेतल्याशिवाय पूर्ण होत नसत, इतका दबदबा त्यांनी सातारच्या राजकारणात निर्माण केला होता. किशोर भाऊ यांनी स्वतः कोणतीही निवडणूक लढली नाही तरी पण किंगमेकर म्हणून अनेकदा त्यांनी आपली भूमिका बजावली होती तर सातारा नगरपालिकेत स्वतःचे सहा नगरसेवकदेखील निवडून आणले होते. तसेच नगराध्यक्ष देखील स्वतःच्या मर्जितील बसवला होता. किशोरभाऊ यांनी रिपाई पक्ष्याच्या वाढीसाठी आपले आयुष्य वेचले मात्र पक्ष्याने त्यांना कधीच आमदारकी किंवा महामंडळाची जबाबदारी दिली नाही त्याची सल कायमच किशोर भाऊंच्या मनात राहिली. त्यांनी आपले हे दुःख अनेकदा पक्ष्याच्या वरिष्ठांना बोलूनही दाखवले होते. मात्र त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले.

आपल्या आयुष्यात जे काही चढ़ उतार झाले. याबाबतचे किशोर भाऊ यांनी “खोळ’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यात त्यांनी सड़ेतोड़ मांडणी करत अनेकांवर लेखनीतून फटकेबाजीदेखील केली आहे. दलित जनतेवर अन्याय झाला की नेहमी पुढे असणारा हा दलितांचा पॅंथर गेली एक वर्ष आजारपणामुळे खचला होता. गेल्या आठवड्यापूर्वीच त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील दिनानात मंगेशकर या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काही दिवसातच त्यांची प्रकृती स्थिर झाली होती मात्र रविवारी रात्री त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे त्यांची प्रणजोत मावळली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. 25 रोजी सकाळी त्यांच्यावर माहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी साताऱ्यातील सर्व स्तरातील निकटवर्तीय व राजकीय मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)