“लवासा’ पार्किंगशुल्कानेच खिसा रिकामा

पिरंगुट – लवासा (ता. मुळशी) येथे आकारण्यात येत असलेल्या अवाजावी पार्किंग शुल्कामुळे पर्यटकांनी या पावसाळ्यात लवासाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे या भागातील रोजगार पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. लवासा येथील पार्किंग शुल्क बंद करण्याची मागणी मुळशी तालुका भाजप युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी खासदार गिरीष बापट व लवासा प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लवासाने आत प्रवेश करण्याच्या ठिकाणीच पार्किंग शुल्क सुरू केले आहे. लवासा देखभालीच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांकडून दुचाकीस 200, चारचाकीस 500 तर मोठ्या गाडीसाठी 1 हजार रुपये शुल्क घेत आहे. परिणामी पर्यटक लवासाकडे पाठ फिरवत आहेत. लवासात शेत जमीन दिलेले जागा मालक येथे सिक्‍युरिटी गार्ड, साफसफाई, हमालीची कामे करत आहे. त्यांनाही तीन ते चार महिने पगार मिळालेला नाही.

मुठा गावापासून पुढे स्थानिकांनी टाकलेले निम्म्या पेक्षा जास्त लहान, मोठे-हॉटेल व इतर व्यवसाय बंद झाले झाले आहेत. पार्किंग शुल्क वाढवण्याच्या आगोदर लवासाला रोज हजारो पर्यटक येत होते ते प्रमाण सध्या खूपच कमी झाले आहे. परिणामी या भागातील तरुण बेरोजगार होत असून गुन्हेगारीकडे वळण्याची भिती निर्माण झाली आहे. जे स्थानिक ठेकेदार आहेत त्यांचे तीन ते चार वर्षांपासून बिलेही देण्यात आलेली नाहीत. लवासा पार्किंग शुल्क ही बाब मुठा आणि मोसे खोऱ्यातील विविध भागातील हॉटेल चालक व नागरिकांसाठी समस्या बनत चालली आहे.

पार्किंग शुल्काच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांकडून लवासाच्या बाहेरच जबरदस्तीने वसूली केली जात आहे. यामुळे पर्यटकांनी मुळशी धरण किंवा इतरत्र जाणे पसंत केले असून मुठा खोरे व लवासा भागातील व्यावसायिकांचे जगणे कठीण झालेले आहे. तरी लवासाकडून आकारण्यात येत असलेले अवाजावी पार्किंग शुल्क बंद करण्याची गरज आहे.

– सागर मारणे, कार्याध्यक्ष, भाजयुमो

लवासाने पार्किंग शुक्‍ल आकरणे सुरू केल्याने पर्यटक याभागात येणे कमी झाले आहे. त्यामुळे हॉटेल बंद करावेसे वाटू लागले आहे. पूर्वी सुट्टीच्या दिवशी रोज अडीच ते तीन हजार रुपयांचा धंदा व्हायचा; परंतु पर्यटक कमी झाल्याने आता 600 ते 700 रुपये पण मिळत नाहीत.

– सचिन मारणे, मालक, समर्थ हॉटेल, आंदगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)