लाल दिव्याची गाडी धुडकावत गरिबांची सेवा सुरु केली- बच्चू कडू

प्रहारच्यावतीने वंचित शेतकऱ्यांना बियाणे वाटप; शहरात वृक्षदिंडी

जामखेड: विधानसभेत मला मंत्री करून, लाल दिव्याची गाडी मिळत होती. मात्र ते पद धुडकावत गरिबांची सेवा सुरू केली. कारण लाल दिव्यापेक्षा जनतेचे अश्रू महत्त्वाचे आहेत, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

आमदार बच्चू कडू यांची जामखेड येथे सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अजय महाराज बारस्कर, राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, उत्तर-दक्षिण जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, अतुल खुपसे, लक्ष्मीबाई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष विमलताई अनारसे, ऍड. लक्ष्मण पोकळे, अजित धस, विठ्ठल गुंड, दादासाहेब काकडे, प्रकाश बेरड, गुलाब जांभळे, जयसिंग उगले, भिमराव पाटील, गणेश हगवणे, सुरेश धुमाळ, प्रताप काशिद, दत्ता शिंदे, शिवाजी सातव, काकासाहेब नेटके, केदार तनपुरेसह तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते.

पुढे आ. कडू म्हणाले, 70 वर्षांपासून सरकार कोणाचेही आले, तरी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. आमचा शेतकरी इकडे शेतात मरतो, तर तीकडे जवान शहीद होते, हे दुर्दैव आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण पद असतानाही तालुक्‍यात एकही पाण्याचा झरा वाहत नाही. आमदार व मंत्र्यांची मुले ज्या शाळेत शिक्षण घेतात, त्या ठिकाणी शिक्षण हे देखील समानतेचे झाले पाहिजे. निवडणुकीत कॉंग्रेस व भाजप यांचे साटेलोटे होते. कारण मुख्यमंत्री व विखेंचे प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम आहे. अशी सडकून टीका कडु यांनी केली. संतोष पवार म्हणाले, तालुक्‍यातील जाणाऱ्या गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला न देता, त्यांनाच नोटीसा काढल्या आहेत. प्रहार संघटना शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)