मेढा येथील बैलबाजाराचा शुभारंभ

बळीराजाच्या दोस्ताची बाजारात उपेक्षा; यांत्रिकीकरणाचा विक्रेत्यांना फटका
प्रसाद शेटे

मेढा – संपूर्ण राज्यात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच पन्नास वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या मेढा, ता. जावली येथील बैल बाजारास रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर बैल व्यापारी, जावली बाजार समिती या सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यांत्रिकीकरणाच्या काळात बैलांचे संगोपन करण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च होत असून, त्यासोबतच शेतामध्ये आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती केली जात असल्याने बैलांच्या मागणी कमी होऊ लागली आहे. त्यातच बैलगाडी शर्यत यावर देखील बंदी आल्याने त्यांची मागणी कमी होऊ लागली आहे. परंतु तरी देखील बैलांची आवड़ असणारे शेतकरी, शर्यत शौकिन यांच्यामुळे अजुनही बैल बाजार भरत आहेत. त्यामुळे यंदा देखील राज्यभर नावाजलेल्या मेढा येथील बैल बाजारास व्यापारी व बैल खरेदी करणाऱ्यानी मोठ्या संख्येने साथ देत बाजाराला सुरुवात झाली.

बैलांचे करायचे काय?

बैल बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनी शर्यतबंदीवर नाराजी व्यक्त केली. बैल विक्रीस घेऊन आलेले एक शेतकरी म्हणाले, माझ्या बैलाची किंमत 40 हजार रुपये आहे. मात्र बाजाराची अवस्था पाहता मला जेमतेम 20 हजारांत समाधान मानावे लागणार आहे. बाजारात जर त्यांना किंमत मिळणार नसेल तर या बैलांचे आम्ही करायचे काय, असा सवाल त्यांनी केला.

शेतीतील वाढते यांत्रिकीकरण आणि बैलांच्या शर्यतीवर केंद्र शासनाने घातलेली बंदी यामुळे ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांचे बाजारमूल्य कमालीचे धोक्‍यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या जावळी तालुक्‍यातील मेढा बैलबाजारात अगदी पहिल्याच दिवशी बैलांचे भाव निम्म्याने घसरले असल्याचे चित्र दिसले. साधारणत: एक लाख रुपये जोडी भाव मिळेल, अशा अपेक्षेने बाजारात बैल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना यंदा जेमतेम 50-60 हजार रुपये मिळवितानाही बरीच यातायात करावी लागत आहे.

मेढा येथील बैल बाजार हा जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार मानला जातो. जिल्ह्यातील तसेच राज्यातील हजारो शेतकरी बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी या बाजाराला भेट देत असतात. हल्ली ट्रॅक्‍टर व अन्य वाहनांमुळे बैलांचा शेतीत फार कमी वापर होतो. त्यामुळे प्रामुख्याने शर्यतींसाठी बैलांचा वापर होऊ लागला होता. मेढा येथे शर्यतीसाठी बैलजोडी घेण्यासाठी खूप लांबवरून लोक येत असत. मात्र आता शर्यतच नसल्याने बैलांचे बाजारमूल्य घसरून शेतकऱ्यांसाठी तो पांढरा हत्ती ठरू लागला आहे. याच वास्तवाचे सावट यंदा मेढा येथील जनावरांच्या बाजारावर आहे. गुढीपाडवापर्यंत विविध जनावरांची खरेदी-विक्री होणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असल्याने जवळपास हजारांहून अधिक जनावरांची विक्री या बाजारात होते. खिल्लारी, डांगी, साहिवाल आदी प्रकारचे बैल या बाजारात असतात. यंदाही बाजारात हजारांपासून लाखांपर्यंतच्या किमतीचे हजारो बैल विक्रीस आले आहेत. मात्र त्या तुलनेत खरेदीदार नाहीत.

लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत पाण्याचे वाटप

मेढा येथील वार्षिक बैलबाजार रंगपंचमी ते गुढीपाडवा या कालावधीत भरत असतो. या दिवसांत उन्हाळा असल्याने पाण्याची टंचाई भासत असते. मात्र यावर्षी विनोददादा पार्टे यांच्या संकल्पनेतून आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत बैलबाजारात येणाऱ्या सर्व जनावरांना मोफत पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून दिले आहेत. याबद्दल बाजारात जनावरे विक्रीस घेऊन येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर कृषि उत्पन्न बाजार समिती जावळी यांनी विनोद दादा पार्टे व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले. या मोफत पाणी वाटप प्रसंगी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक विनोद दादा पार्टे, नगराध्यक्षा सौ. द्रौपदा मुकणे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र शिंदे, सदस्य विठ्ठल देशपांडे, शांताराम पार्टे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)