इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी राजकारणापासून दूर राहावे आणि कायद्याच्या चौकटीत वागावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. त्याचबरोबर द्वेषभावना पसरवणारे, अतिरेकी आणि दहशतवादी यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे आदेश सरकारला दिले आहेत.
कट्टरवादी टीएलपी (तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान) च्या सन 2017 सालच्या फैजाबाद बैठ्या सत्याग्रहाच्या बाबतीत निकाल देताना न्यायमूर्ती काझी फैजल आणि न्यायमूर्ती मुशीर आलम यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी द्वेष पसरवणारे, अतिरेकी आणि दहशतवादी यांच्यावर काबू ठेवावा असेही त्यांनी सांगितले.
सर्व सरकारी आणि संस्था आणि विभागांनी, यात लष्कराच्या आयएसआय सारख्या संस्थांचाही समावेश आहे, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या. लष्कराला एखाद्या पक्षाला, गटाला वा व्यक्तीला पाठिंबा देण्यासारख्या कोणत्याही राजकीय क्रियाकलापात भाग न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान इम्रान खान यांना देशाच्या शक्तिमान लष्कराने पाठिंबा दिल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या जवळपास अर्ध्या काळ पाकिस्तानी लष्कराने विविध बंडे करून देशावर सत्ता गाजवली. देशाच्या निर्णयांमध्ये लष्कराचा मोठा हात असतो, असे सांगून इतरांना त्रास देणारे धार्मिक फतवे बेकायदेशीर ठरवले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा