रांची (झारखंड) – राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील “एम्स’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते.
लालूप्रसाद यांना हृदय आणि किडनीशी संबंधित आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अधिक उपचारांसाठी त्यांना दिल्लीच्या “एम्स’मध्ये हलवण्याचे ठरले आहे. तेथे हलवण्याची निश्चित तारीख तुरूंग प्रशासनाकडून ठरवण्यात येईल, असे राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले.
झारखंड उच्च न्यायालयाने चारा गैरव्यवहारप्रकरणी लालूप्रसाद यांच्या जामीन अर्जावरील 11 मार्च रोजी होणारी सुनावणी 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यापूर्वी सीबीआय न्यायालयाने चारा घोटाळ्याशी संबंधित पाचव्या प्रकरणात लालूप्रसाद यांना दोषी ठरवून पाच वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्यांना 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.