असेही काही

निवडणुकांच्या इतिहासाची पाने उलटताना असंख्य रंजक घटनांचे किस्से समोर येतात. आता हेच पाहा ना, ही घटना आहे 2004 च्या लोकसभा निवडणुकांमधील. उत्तराखंडमध्ये बहुजन समाज पार्टीच्या दोन उमेदवारांनी पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांना एक मोठा झटका दिला. डेहराडूनमधील परेड ग्राऊंडवर मायावतींची रॅली होणार होती. नेमक्‍या त्याच वेळी टिहरी आणि अल्मोडा या दोन लोकसभा मतदारसंघातील जागांवरून घोषित झालेले बसपाचे उमेदवार गायब झाले.

रॅली सुरू होण्याची वेळ आली तरीही त्यांचा पत्ता नव्हता. पक्षाच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. पण उमेदवार कुठे गेले कोणालाही माहीत नव्हते. यादरम्यान मायावती रॅलीमधील उपस्थितांना संबोधण्यासाठी पोहोचल्या. त्यांना जवळपास एक तासाहून अधिक काळ गेस्ट हाऊसमध्ये वाट पाहात बसावे लागले होते. तेवढ्यात खबर आली की त्या उमेदवारांनी बसपाला रामराम करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. साहजिकच पक्षाला हा मोठा धक्‍का होता.

या घटनेवरून पक्षात खूप खडाजंगी झाली. मायावतीही प्रचंड संतापल्या होत्या. पण तरीही मन मारून त्यांना सभेसाठी जाणे आणि व्यासपीठावर विराजमान होणे अपरिहार्य होते. तथापि, त्यांच्यामध्ये रॅलीविषयी फारसा उत्साह नव्हता. इतकेच नव्हे तर त्यांनी उमेदवारांची नावे न घेताच बसपाला विजयी करण्याचे आवाहन केले. त्या दिवशी मायावती इतक्‍या कमालीच्या चिडल्या की आजतागायत त्यांनी या परेड ग्राऊंडवर सभेला संबोधित करण्यासाठी पाऊल ठेवलेले नाही. 2004 च्या या निवडणुकीत बसपाला टिहरी आणि अल्मोडा या दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला. बसपा हा पराभव आजही विसरलेला नाही. तेव्हापासून आजपर्यंत मायावतींची एकही रॅली डेहराडूनमध्ये झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)